GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video
esakal May 01, 2026 01:45 AM

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Marathi Update : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये पहिल्यांचा पूर्णपणे बॅकफूटवर फेकलेले पाहायला मिळाले. विराट कोहलीने आक्रमक सुरूवात करून दिली खरी, परंतु अन्य फलंदाजांनी माती खाल्ली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम मारा करताना RCB ला कमी धावसंख्येवर रोखले. रजत पाटीदारच्या विकेटवरून या सामन्यात वाद रंगलेला पाहायला मिळाला. त्याला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला.

विराट कोहलीने दुसऱ्या षटकात कागिसो रबाडाला सलग पाच चौकार मारल्यानंतर आज धावांचा डोंगर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, मोहम्मद सिराजने तिसऱ्या षटकात जेकब बेथल ( ५) याला माघारी पाठवले आणि त्यानंतर रबाडाने मागील षटकात झालेल्या अपमानाचा वचपा काढला. विराट १३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह २८ धावांवर झेलबाद झाला. फटका मारण्यासाठी पुढे आलेल्या विराटला त्याने आखूड टप्प्याचा चेंडू टाकला अन् विराटचा फटका चुकला. राशिद खानने अप्रतिम झेल टिपला आणि RCB चे दोन्ही सलामीवीर ३५ धावांत माघारी परतले.

फॉर्मात असलेला देवदत्त पडिक्कल मैदानावर उभा राहिला, परंतु त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. कर्णधार रजत पाटीदार ( १९) काही काळ मैदानावर उभा राहिला, परंतु त्याच्या विकेटने वेगळाच वाद सुरू झाला. जेसन होल्डरने डीप स्क्वेअर लेगवर अविश्वसनीय झेल टिपला, परंतु तोल गेल्यावर त्याने चेंडू जमिनीवर टेकल्याचा आरोप केला गेला. विराटने त्या निर्णयाविरुद्ध अम्पायशी वादही घातला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. रजतच्या विकेटनंतर जितेश शर्मा ( १), टीम डेव्हिड ( ९) व कृणाल पांड्या ( ४) हे स्वस्तात माघारी परतल्याने RCB ची अवस्था ६ बाद ९६ अशी केली.

पडिक्कल सुरेख फटकेबाजी करताना दिसला आणि १४ व्या षटकात राशिद खानच्या चेंडूंवर त्याने उत्तुंग फटकेही मारली. पण, राशिदने शेवटच्या चेंडूवर पडिक्कलचा त्रिफळा उडवला. तो २४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावांवर बाद झाला. राशिदने पाचवेळा पडिक्कलची विकेट घेतली. बंगळुरूला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वेंकटेश अय्यरला मैदानावर उतरवावे लागले. पण, होल्डरच्या पुढच्याच चेंडूवर रोमारिओ शेफर्ड ( १७) झेलबाद झाला.

त्यामुळे शेवटच्या सहा षटकांत वेंकटेश संघांसाठी किती धावांची भर घालतो याची उत्सुकता होती. कागिसो ( १-४४), जेसन ( २-२९) व राशिद ( २-१९) यांनी अशी स्पेल संपवली. भुवनेश्वर कुमारने आज त्याच्या फलंदाजी कौशल्याने सर्वांना अचंबित केले. त्याला पाहून वेंकटेशनेही १२ चेंडूनंतर पहिला चौकार मारला. २०व्या षटकात वेंकटेश ( १२) झेलबाद झाला. भुवी १५ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूचा संपूर्ण संघ १५५ धावांत तंबूत परतला. अर्शद खानने २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.