कठीण दिवस उन्हाळ्याचे...
esakal May 01, 2026 06:45 AM

डॉ. मालविका तांबे

२०२६. बघता बघता परत मे महिन्याच्या दारात उभा आहे. ऋतुचक्रानुसार ऋतु बदलत राहतात आणि निसर्ग आणि मनुष्याचा एकमेकावर होणारा प्रभाव चालू राहतो. दरवर्षी पेक्षा यावर्षी गरमी जरा जास्त प्रमाणात आहे असं प्रत्येकालाच वाटतंय. तापमान प्रचंड वाढलेले आहेत. दिवसभराचा सूर्यप्रकाश नकोसा झालेला आहे. कूलर, एसी, पंखा याच्याशिवाय जगणे अगदी कठीण होत चाललेलं आहे. सतत घाम येणे, शरीरात जलांश अर्थात हायड्रेशन कमी होणे, अपचन होणे, जुलाब, उलट्या, उष्माघात असे सगळे त्रास या काळात फारच प्रमाणात दिसतात. शरीरातली अग्नि मंदावल्यामुळे खायची प्यायची इच्छासुद्धा होत नाही. एकूणच हे महिने कसे पटकन जातील याचा विचार सगळ्यांच्या मनात सतत असतो.

आयुर्वेदा प्रमाणे या काळात आहारामध्ये स्निग्ध, द्रव, शीतल व पचायला हलके पदार्थ ठेवणे चांगले. शीतल म्हणल्यावरती सगळ्यात पहिले लोकांना आठवतं ते म्हणजे फ्रिज मधलं गार पाणी आणि बाजारात मिळणारे आईस्क्रीम पण जेव्हा आपण शीतल म्हणतो तेव्हा ते जीभेला किंवा घशाला लागणार गार नव्हे तर शरीराच्या आत मध्ये शीतलता आणणाऱ्या पदार्थांबद्दल आयुर्वेद मार्गदर्शनात सांगते.

रोज पिण्याचं पाणी उकळून गार केलेले उत्तम असते. पिण्याचं पाणी, वाळा, चंदन, नागरमोथा वगैरे वनस्पती अर्थात जलसंतून टाकून उकळलेले असले तर ते उत्तम असतं. जलसंतुलन मध्ये असलेल्या सहा वनस्पती या शरीरात शीतल गुणधर्म तर पचन जलांश वाढायला मदत करतात व तसेच शरीरातलं पचन सुद्धा सुधरायला मदत करतात. उकळलेले पाणी सामान्य तापमानाला आल्यावरती मातीच्या माठात ठेवून गार केले तर पित्ताचा त्रास कमी होतो व तसेच लघवी पण साफ व्हायला मदत मिळते. शहाळ्याचं पाणी या काळामध्ये नियमित घेतलेलं उत्तम असतं. आयुर्वेदाप्रमाणे नारळ हा पौष्टिक असतो. स्निग्ध गुणांचा असतो, शीतवीर्य असतो व चवीला अत्यंत उत्तम असतो. शरीरात बल वाढवणारा असतो. त्यामुळे गर्मीच्या दिवसात जर का शहाळ्याचं पाणी प्यायलं तर शरीरामध्ये शीतलता येते. शरीराची ताकद वाढते व तसेच शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट चं संतुलन व्हायला सुद्धा मदत मिळते. दुपारच्या वेळेला शहाळ्याचं पाणी नियमित घेतल्याने आरोग्याकरता उत्तम ठरतं व तसेच कुठे बाहेरगावी गेल्यावरती किंवा कामानिमित्त बाहेर असल्याल तहान लागलेली असताना शहाळ्याचं पाणी घेणं हे संक्रामक रोगांपासून लांब राहायला सुद्धा मदत करतं. क्वचित काही कारणांमुळे उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास सुद्धा शहाळ्याचं पाणी नियमित घेतल्याने त्याचा फायदा मिळतो. याच बरोबरीने घरी केलेले ताजे लिंबाचे सरबत, कोकम सरबत हे ही वरचेवर घेतल्याचा फायदा मिळू शकतो. या काळामध्ये शीतल करून किंवा सामान्य तापमानाचे दूध प्यायलेले सुद्धा उत्तम असते. गाईचे किंवा म्हशीचे दूध शरीरात ताकद वाढायला मदत करतात. बदाम, वेलची, खडीसाखर इत्यादी घालून गार दूध घेणे आरोग्याकरता उत्तम ठरते. याशिवाय सुद्धा संतुलनचं गुलकंद किंवा चैतन्य कल्प, शतावरी कल्प घालून सुद्धा मिल्क शेक बनवता येऊ शकतात. असे शेकचवीला तर उत्तम असतातच पण त्याच्याने स्वास्थ्य टिकून राहायला मदत मिळते. बऱ्याचश्या जागी फळं टाकून मिल्क शेक बनवण्याची पद्धत दिसते. पण आयुर्वेदा प्रमाणे दूध आणि फळं हे विरुद्ध अन्न असतात. त्यामुळे मिल्क शेक संपूर्णपणे टाळलेले बरे.

क्वचित काही प्रसंगी फक्त दुधामध्ये अगदी पूर्णपणे पिकलेला आंबा थोड्या प्रमाणात घालून प्यायला काही काही आचार्यांनी परवानगी दिलेली आहे. पण त्वचे संबंधित काही त्रास असल्यास किंवा घराण्यामध्ये एलरजिक टेनडेनसिस असल्यास हे टाळलेले बरे राहील. आंब्याच्या मिल्कशेकपेक्षा कैरीचे पन्हं हे जास्त रुचकरु पचनासाठी व आरोग्यासाठी उत्तम असतं. आंबा हा या काळातला सगळ्यात आवडता फळ असतो. बऱ्याच लोकांना उन्हाळा सुसह्य फक्त आंब्याच्या उपस्थितीमुळे वाटतो. आयुर्वेदानुसार आंबा हा वीर्यवर्धक असतो. शरीरातला बल वाढवतो पण उष्णवीर्य असतो. पिकलेला आंबा खाणं जास्त उत्तम असतं. आंब्याचा रस काढण्याकरता आंबा किमान दोन तीन तास तरी पाण्यामध्ये भिजवून ठेवावा. नंतर त्याचा रस काढून त्याच्यामध्ये साजूक तूप किंवा सुंठीची थोडी पूड व वेलचीची पूड घालून मग दुपारच्या जेवणात घ्यावा. याच्याने आंबा पचायला सोपा जातो. शक्यतो मधुमेही व्यक्तींनी आंबा पूर्णपणे टाळावा पण खायचाच असल्यास उपरोक्त नियम पाळून खाल्ल्यास रक्तशर्करा फार प्रमाणात वाढत नाही. ज्या व्यक्तींचं वजन जास्त असेल त्यांनी सुद्धा आंबा फार प्रमाणात खाणं योग्य नाही. अशा व्यक्तींनी एक किंवा दोन फोडी आंब्याच्या एका वेळेला खाल्लेल्या चालतील.

याच काळात द्राक्ष सुद्धा येतात. चवीमुळे जसा आंबा फळांचा राजा मानला जातो तसं आयुर्वेदांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने द्राक्ष हे फळांमध्ये सगळ्यात उत्तम सांगितलेले आहेत. द्राक्ष नुसते खाणे किंवा द्राक्षाचा रस काढून पिणे हे उन्हाळ्यामध्ये अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. उन्हाळ्यामध्ये लघवीत होणारी जळजळ, हातापायांची किंवा डोळ्यांची आग होत असल्यास द्राक्षाचा रस किंवा काळ्या मनुकांचं पाणी दोन्हीही घेतल्यास फायदा होऊ शकतो. एवढेच नव्हे तर खरबूज आणि कलिंगड ही दोन्हीही फळं या काळातली वैशिष्ट्य असतात. दोन्हीही फळं मूत्रल आहेत व तसेच याच्याने शरीराला ताकद सुद्धा मिळायला मदत मिळते. या काळात येणारा उसाचा रस सुद्धा वीर्याने शीतल असतो, पौष्टिक असतो व शुक्रवर्धक असतो. ताजा उसाचा रस थोडसं लिंबू, काळं मीठ घालून प्यायल्याने तनाला व मनाला दोन्हींलाही आल्हाददायक ठरतं. फक्त जुना उसाचा रस पिऊ नये.

या काळात ice cream सुद्धा बरंच खाल्लं जातं. ice cream खाताना ते नक्की दुधापासूनच तयार केलेलं आहे याची खात्री करून घ्यावी. सध्याच्या काळात बरीचशी ice cream वनस्पती स्नेहापासून बनवलेली असतात आणि ती आरोग्याकरता अत्यंत अहितकर असतात.

शक्यतो आहारामध्ये मऊ भात, तांदळाची खीर, ताक भात, घरचं केलेलं ताजे ताक, जिरेपूड, सैंधव मीठ घालून नियमित घ्यावे. नाचणीची पेज किंवा फोडणी घालून केलेलं ज्वारीचं, तांदळाचं किंवा भगरीचं दही भात खावा. पण दही खायची इच्छा असल्यास ते ताजे असावे आणि त्याला खाताना त्याच्यामध्ये सैंधव मीठ किंवा खडीसाखर घालून खावे किंवा एखाद्या आहार पदार्थाबरोबरच दही खाल्लेलं उत्तम राहील. त्यामुळे या काळात दह्यात केलेल्या वेगवेगळ्या कोशिंबिरी खाणे उत्तम ठरते. दह्यापेक्षा ताक जास्त उत्तम ठरते तसेच मूग शीतल गुणधर्माचे असल्यामुळे या काळात जास्त वापरावे. उदाहरणार्थ मुगाची धिरडी, मुगाची डाळीची भाजी, मोड आणलेल्या मुगाची उसळ इत्यादी सारख्या पाककृती आपल्या आहारात ठेवाव्या. आमटी किंवा भाजी करत असताना जिरे, धने, कोकम, वेलची, दालचिनी इत्यादी सारखे मसाले वापरावे व तसेच ओला नारळ, कांदा, पुदिना, कोथिंबीर याचाही वापर करता येतो.

बाजारातून तयार सरबत सिरप आणून वापरणे शक्यतो टाळावे. कारण की त्याच्यामध्ये कृत्रिम रंग, रासायनिक पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतात. घरात फळांचा ताजा रस काढून प्यावा किंवा फळांच्या गरामधे थोडे गार पाणी, वेलची पूड, जिरे पूड व चवीनुसार मिरे पूड घालून पानक तयार करता येतं. आयुर्वेदामध्ये आंबा, खैर, खजूर, मनुका, डाळिंब, फालसा, आवळा, चिंच वगैरे पानक तयार करायला सुचवलेले आहेत. असे तयार केलेले पानक आठ ते दहा तास चांगले राहते. त्यामुळे बाहेरून आल्यावरती हेच प्यायलेले जास्त उत्तम राहील. तसेच रोज संतुलनचे गुलकंद स्पेशल, अविपत्ती कर चूर्ण, पित्तशांती, प्रवाळ पंचामृत मोतीयुक्त घेतलेले जास्त उत्तम राहतात. तसेच शक्य असल्यास नियमित पादाभ्यंगकरणेसुद्धा उष्णतेच्या या कठीण काळाला सुसह्य बनवायला मदत करू शकतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.