रव्याचा उपमा रोजच्या नाश्त्यात खाऊन जर तुम्हालाही थोडा कंटाळा आला असेल, तर आता वेळ आहे काहीतरी हटके आणि पौष्टिक ट्राय करण्याची! ज्वारीपासून बनणारा ज्वार उपमा हा असा नाश्ता आहे जो चवीलाही भारी आणि आरोग्यालाही तितकाच फायदेशीर ठरतो. साध्या साहित्यापासून झटपट तयार होणारी ही डिश दिवसभर एनर्जी देणारी, पोटभर ठेवणारी आणि पचनासाठीही हलकी आहे. रोजच्या धावपळीमध्ये हेल्दी खाण्याचा स्मार्ट पर्याय शोधत असाल, तर हा ज्वार उपमा नक्कीच तुमच्या नाश्त्याच्या यादीत अॅड करा.
साहित्य1 कप ज्वारी
1 छोटा चमचा मोहरी
1 छोटा चमचा उडीद डाळ
1 कांदा (बारीक चिरलेला)
1/4 कप उकडलेले हिरवे वाटाणे
2 हिरव्या मिरच्या (चिरलेल्या किंवा मधून कापलेल्या)
चिमूटभर हिंग
1 इंच आले (बारीक चिरलेले)
6-7 कढीपत्त्याची पाने
2 मोठे चमचे तेल
चवीनुसार मीठ
1 मोठा चमचा लिंबाचा रस
कोथिंबीर (सजावटीसाठी)
ऐच्छिक: गाजर, शिमला मिरची (बारीक चिरलेली)
ज्वारी आधी नीट धुऊन किमान 7–8 तास किंवा रात्रभर भिजत ठेवावी. भिजवल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे.
प्रेशर कुकरमध्ये ज्वारी घालून त्यात 2 ते 3 कप पाणी आणि थोडे मीठ घालून शिजवावे. साधारण 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस कमी करून प्रेशर नैसर्गिकरीत्या उतरू द्यावा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडायला लागली की त्यात उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि आले घालून हलके परतून घ्यावे.
यानंतर कांदा घालून तो मऊ आणि हलका पारदर्शक होईपर्यंत परतावा. त्यात वाटाणे आणि इतर भाज्या घालून थोडा वेळ शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळावे आणि काही मिनिटे झाकून ठेवावे.
शेवटी शिजवलेली ज्वारी या मिश्रणात घालून नीट परतावे. 2–3 मिनिटे सर्व एकत्र शिजू द्यावे म्हणजे चव छान एकजीव होते.
गॅस बंद करून वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. गरमागरम ज्वार उपमा सर्व्ह करा.
हा उपमा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट असून तो आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.