राज्यातील हवामानात कमालीचा बदल झाला. उष्णता प्रचंड वाढली आहे. सूर्य आग ओकत आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळाच. विदर्भात अनेक ठिकाणी पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. आजही राज्यात उष्णतेचा चटका कायम असेल विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. मुंबईमध्ये आजपासून पुढे 4 दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपायोजना राबवल्या जात आहेत. भंडारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीव्र उष्णतेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने अत्यावश्यक काम असल्यासच दुपारी घराबाहेर पडावे, अन्यथा भर उन्हात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
राज्यात पुढील काही दिवसात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. 2 मेपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता देखील विदर्भात वर्तवण्यात आली. 2 तारखेनंतर विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यातील बाकी ठिकाणी उष्णता कायम असेल.
महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्याचे तापमानाचा पारा 40 च्या पुढे राहणार आहे. काही लोकांकडून तापामानाबाबत समाज माध्यमांवर चुकीचे संदेश पसरवले जात आहेत, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, हवामान विभागाकडून अधिकृत माहिती दिली जातेय यावर विश्वास ठेवा असे हवामान विभाग शास्त्रज्ञ एस. डी सानप यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यासह जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून पारा 42 ते 43 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत. दरम्यान, पाचोरा तालुक्यात उष्माघातामुळे एका फळविक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.