Shahaji Raje Upcoming Marathi Movie: महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din) औचित्यावर मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Cinema) एक दमदार घोषणा करण्यात आली आहे. संतोष डावखर (Santosh Davakhar) यांचा 'गोंधळ' (Gondhal Marathi Movie) चित्रपट जागतिक स्तरावर झेप घेत असतानाच आता ते प्रेक्षकांसाठी आणखी एक भव्य ऐतिहासिक पर्व घेऊन येत आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित 'शहाजीराजे' (Shahaji Raje Marathi Movie) या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टरमध्ये शहाजीराजांचा भव्य, गंभीर आणि राजेशाही अंदाज पाहायला मिळत असून, त्यातून चित्रपटाच्या दिमाखदार मांडणीची झलक दिसते.
पोस्टरमध्ये चेहऱ्यामागे वाहणारा वारा त्या काळातील रणभूमीची तीव्रता आणि संघर्षाची जाणीव अधिक ठळकपणे करून देतो. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट असून पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची लाट निर्माण झाली आहे.

संस्कृती आणि इतिहासाशी घट्ट नातं जपणाऱ्या विषयांवर काम करण्यासाठी ओळखले जाणारे संतोष डावखर यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील, पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेले शहाजीराजे भोसले यांच्या जीवनावर आधारित कथा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कर्तृत्व, शौर्य आणि विचारांचा ठसा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे.
'गोंधळ'नंतर संतोष डावखर पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या आणि आशयघन विषयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, 'शहाजीराजे' हा चित्रपट 2027 साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट तब्बल 6 भाषांमध्ये सादर केला जाणार असून, मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या भव्य चित्रपटात शहाजीराजेंची भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली असतानाच या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका मोठ्या कलाकाराची वर्णी लागणार असल्याचेही बोलले जात आहे.
'गोंधळ'प्रमाणेच थरार आणि भव्यतेचा अनुभव 'शहाजीराजे'मध्ये पाहायला मिळेल का, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे. इतिहासाची भव्यता आणि संस्कृतीचा गौरव मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता या चित्रपटाची आतुरता लागली आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने 'शहाजीराजे'ची घोषणा करणं आमच्यासाठी खूप खास आहे. आपल्या इतिहासातल्या अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी शहाजीराजे हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आम्ही अभिमानाने प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आम्ही आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत."