Maharashtra Weather Update : मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्रासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरली आहे. राज्याच्या अनेक भागांत सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, पुणे (Pune) आणि मुंबईसह (Mumbai) अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पलीकडे गेला आहे. एकीकडे उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) नागरिक होरपळत असतानाच, दुसरीकडे हवामान विभागाने (IMD) अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा दिल्याने राज्याच्या हवामानात मोठा 'ट्विस्ट' पाहायला मिळणार आहे. पुढील 48 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी (Maharashtra) अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
हवामान विभागाने अमरावती, वर्धा आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या ठिकाणी पारा 46 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नागपूरमध्ये उष्माघातामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही (Mumbai) दमट हवेमुळे नागरिक हैराण असून, पुढील 4 दिवस मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
उन्हाच्या या कडाक्यामध्ये विदर्भासाठी एक दिलासादायक बातमी आहे. उद्या, 2 मे पासून वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. या पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो, मात्र तत्पूर्वीची उष्णता असह्य ठरणार आहे. तर, राज्याच्या हवामानातील हा ऊन-पावसाचा खेळ मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात असाच सुरू राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
पुढील दोन दिवस घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरपूर पाणी पिणे, दुपारी 12 ते 4 दरम्यान उन्हात जाणे टाळणे आणि सुती कपड्यांचा वापर करणे यांसारख्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही पारा वाढल्याने शेतीवर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या