इंदापूर : पुणे–सोलापूर महामार्ग वरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील टोल नाक्यावर शुक्रवार (ता.01 मे ) रोजी दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. भर उन्हात तापमान 40 अंशांच्या पुढे गेलेले असताना तब्बल पाच किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालक आणि प्रवासी अक्षरशः हैराण झाले.
दुपारच्या वेळेत वाढलेल्या गर्दीमुळे टोल नाक्यावर वाहनांची रांगा लागल्या. खासगी वाहनांसह मालवाहू ट्रक, बस यांची मोठी रांग लागल्याने सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचेही हाल झाले. उन्हाच्या तडाख्यात दीर्घकाळ वाहनांमध्ये अडकून पडल्याने प्रवासी त्रस्त झाले होते.वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत टोल व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. “नियमितपणे अशा समस्या निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,” अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, सरडेवाडी टोल प्रशासनाचे व्यवस्थापक सतीश चव्हाण यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिन, त्यानंतर सलग आलेला शनिवार-रविवार तसेच विवाह मुहूर्तांमुळे वाहतुकीत अचानक मोठी वाढ झाली. “वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने टोल यंत्रणेवर ताण आला. तरीही पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन अतिरिक्त लेन सुरू करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला,” तसेच पुढील काळात अशा प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, असे आश्वासनही टोल प्रशासनाकडून देण्यात आले आहे.