Nagpur Crime News: नंदनवनमधील व्यंकटेशनगरात दुर्दैवी घटना; आई-मुलीने एकाच घरात गळफास घेऊन जीवनयात्रेला पूर्णविराम
esakal May 01, 2026 07:45 PM

नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरातील फेज-१, बिल्डिंग क्रमांक १, फ्लॅट क्रमांक १ येथे आई-मुलीने एकाच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संगीता श्रीराम ढबाले (वय ५२), आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (वय २९, रा. ओम नगर, सक्करदरा) अशी मृत आई आणि मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा हिला दोन महिन्यांपूर्वी बाळ झाले होते. मात्र, जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला होता. त्या धक्क्यातून सावरण्यासाठी ती आईकडे राहायला आली होती.

शुक्रवारी (ता. १) सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास आकांक्षाचे पती लोकेश सुधाकर ब्रह्मे (वय ३०) घरी आले असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघीही गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना दिसल्या. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना व नातेवाईकांना बोलावले.

शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि आकांक्षाला खाली उतरवले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह खाली उतरवून पुढील तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात दरवाजा आतून बंद असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी आत्महत्येचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाळाच्या मृत्यूनंतर आलेल्या नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.