Samruddhi Expressway safety: समृद्धी महामार्गावर 'झिरो फॅटॅलिटी'साठी नागपूर पोलिस सज्ज
esakal May 01, 2026 07:45 PM

नागपूर : समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून, सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि मर्सिडीज बेंझ इंडिया यांच्या सहकार्याने ड्रग टेस्टिंग किट्स व ब्रेथ अॅनालायझर्सची उपलब्धता करून देण्यात आली आहे. मद्यपान किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक पियुष तिवारी यांच्या उपस्थितीत या उपकरणांचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. या उपक्रमामुळे चालकांची तपासणी जलद, अचूक आणि पुराव्याधारित पद्धतीने करता येणार असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई शक्य होणार आहे.

यासोबतच, वाहतूक विभागातील २५ अधिकाऱ्यांना ‘हँड्स-ऑन’ प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये उपकरणांचा वापर, कॅलिब्रेशन आणि प्रत्यक्ष कारवाईदरम्यानचे प्रोटोकॉल शिकविण्यात आले. त्यामुळे समृद्धी महामार्गासह शहरातील प्रमुख मार्गांवर अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे.

हा उपक्रम ‘झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर’ (झेडएफसी) कार्यक्रमाचा भाग असून, अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी अभियांत्रिकी, शिक्षण, अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवा या चार घटकांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. विशेष म्हणजे, या मॉडेलमुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मृत्यूदरात लक्षणीय घट झाल्याचेही नमूद करण्यात आले.

मद्यपान व अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. नवीन उपकरणांमुळे अशा वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करून रस्ते अधिक सुरक्षित करता येतील.

डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त, नागपूर शहर

रस्ता सुरक्षिततेकडे उचललेली महत्त्वाची पावले

  • प्रदान केलेली उपकरणे : २ ड्रग टेस्टिंग किट्स, १० ब्रेथ अॅनालायझर्स

  • प्रशिक्षित अधिकारी : २५

  • समृद्धी महामार्ग लांबी : ७०१ किमी

  • २०२३ मध्ये मद्य/ड्रग्समुळे मृत्यू : ३,६०० पेक्षा अधिक

  • झेड एफ सी मॉडेलमुळे घट (मुंबई–पुणे मार्ग) : ५८%

  • उद्दिष्ट : ‘झिरो फॅटॅलिटी’ – अपघाती मृत्यू शून्यावर आणणे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.