RR vs DC Live: 'Vaping'चा वाद अन् पेटला रियान पराग! ८ चौकार, ५ षटकारांसह कुटल्या ९० धावा... राजस्थान रॉयल्सने उभे केले तगडे लक्ष्य
esakal May 02, 2026 01:45 AM

Rajasthan Royals vs Delhi Capitals Marathi Update:'ई सिगारेट' वादात सापडलेल्या रियान परागने ( Riyan Parag) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी दमदार खेळी केली. त्याचे आयपीएलमधील पहिले शतक १० धावांनी हुकले, परंतु त्याने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल हे राजस्थान रॉयल्सचे दोन्ही फॉर्मात असलेले सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या मिचेल स्टार्क व कायले जेमिन्सन यांनी धक्के दिल्यानंतर RR च्या मधल्या फळीची कसोटी होती. त्यावर रियान व ध्रुव जुरेल खरे उतरले, रवींद्र जडेजानेही कर्णधाराला चांगली साथ दिली आणि त्यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पण, पहिलाच सामना खेळणाऱ्या मिचेल स्टार्कनेही मॅच गाजवली.

RR ला आज अपेक्षित सुरूवात करता आली नाही. पॉवर प्लेमध्ये दबदबा राखणाऱ्या या संघाचे दोन्ही सलामीवीर दोन षटकांत माघारी परतले. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालने ( ६) षटकार खेचला खरा, परंतु ऑसी गोलंदाजाने तिसरा चेंडू फुलटॉस टाकला अन् यशस्वी त्यावर मोठा फटका मारू शकला नाही. चेंडू हवेत जागच्या जागी उडाला, तो स्टार्कनेच झेलला. स्टार्क आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीयांच्यातल्या चुरशीची सर्व वाट पाहत होते. पण, कायले जेमिन्सनेने दुसऱ्याच षटकात वैभवचा ( ४) त्रिफळा उडवला. अप्रतिम यॉर्कवर वैभवचा त्रिफळा उडाल्यानंतर जेमिन्सनचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.

आयपीएल सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचणारा यशस्वी हा पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी नमन ओझाने ( RR) ने ब्रॅड डॉज ( KKR) ला २००९ मध्ये, विराट कोहलीने RRच्या वरुण आरोनला २०१९ मध्ये, फिल सॉल्टने ( KKR) ने नुवान तुषाराला ( MI) २०२४ मध्ये आणि प्रियांश आर्यने (PBKS ) २०२५ मध्ये खलील अहमदला ( CSK) पहिल्याच चेंडूवर षटकार हाणला होता. यशस्वीने सर्वाधिक चार वेळा आयपीएल डावात पहिल्या चेंडूवर षटकार खेचले आहेत. त्यानंतर प्रियांश ( २) चा क्रमांक येतो. दोन्ही सलामीवीर १२ धावांवर माघारी परतल्यानंतर RR च्या मधल्या फळीची आज खरी कसोटी होती.

कर्णधार रियान पराग व ध्रुव जुरेल यांनी संघाला पॉवर प्लेमध्ये २ बाद ५६ धावांपर्यंत पोहोचवले आणि ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रियानला आज चांगलाच सूर गवसलेला दिसला, मागील सामन्यात इ सिगारेट पिण्यावरून तो वादात अडकला होता आणि BCCI ने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यानंतर तो प्रथमच मैदानावर उतरला आणि आपल्या खेळीने टीकाकारांना उत्तर दिले. अक्षर पटेलने टाकलेल्या ९व्या षटकार रियानने सलग दोन सुरेख षटकार खेचले. त्याने ३० चेंडूंत या आयपीएलमधील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले.

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

अक्षरने दिल्लीला अपेक्षित विकेट मिळवून दिली. ध्रुव ३० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४२ धावांवर झेलबाद झाला आणि रियानसोबत त्याची ५९ चेंडूंत १०२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. १३ व्या षटकात रवींद्र जडेजाला रन आऊट करण्याची आयती संधी चालून आली होती, परंतु आशुतोष शर्माला डायरेक्ट हिट करता आला नाही. रियान व जड्डू यांनी २७ चेंडूंत ५३ धावा जोडून संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेले. जडेजा १४ चेंडूंत २० धावांवर स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच षटकात रियानलाही त्याने माघारी पाठवले. त्याने ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने शानदार ९० धावा ठोकल्या. स्टार्कने ४० धावांत ३ विकेट्स घेतल्या. डोनोव्हन फरेराने शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून राजस्थानला ६ बाद २२५ धावांपर्यंत पोहोचवले. फरेरा १४ चेंडूंत ४७ धावा कुटल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.