Abhijit Panse Missing Link: मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी 'मिसिंग लिंक' (Missing Link) तयार करण्यात आले. काल 1 मे महाराष्ट्र दिनी थाटामाटात 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितित या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. उद्घाटन जरी झाले असले तरी अद्याप प्रवाशांचा मनस्ताप काही संपलेला नाही. तांत्रिक तसेच सुरक्षेच्या कारणास्तव पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी मार्गिका अजून बंद ठेवण्यात आली. परिणामी शनिवारी लोणावळा घाटावर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवाशांना बसला. तसेच मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी व्हिडीओ शूट करुन 'मिसिंग लिंक इज मिसिंग', असं म्हणत सरकारवर टोला लगावला. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
“मिसिंग लिंक" खरोखरच मिसिंग आहे!
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 2, 2026
“कालच मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं आणि आज रस्ताच बंद ? घाट पुन्हा ट्रॅफिकच्या विळख्यात! कोणाला पोलीस स्टेशन माहित असेल तर सांगा, कारण मला 'मिसिंग लिंक'ची मिसिंग रिपोर्ट नोंदवायची आहे!”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजीत पानसे यांचा… pic.twitter.com/motwaDZErn
माहितीनुसार, मुंबईहून पुण्याला जाणारी मार्गिका सुरू असली तरी, पुण्याहून मुंबईकडे जाणारी लेन बंद ठेवण्यात आली आहे. बॅरिकेट्स अद्याप महामार्गावर आहेत, ते काढण्याचे काम आज दुपारपर्यंत होणार होते. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग सुरू झाला नव्हता. दरम्यान, अनेकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी असा गोंधळ उडाल्याने प्रवाशांना संताप व्यक्त केला.
पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात असताना लोणावळ्याजवळ मनसे नेते अभिजीत पानसे वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी व्हिडीओ शूट करत सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला. अभिजीत पानसेंनी व्हिडीओत म्हटलं की, 'नमस्कार मी अभिजीत पानसे. पुण्याहून मुंबईकडे येतोय. आता मी घाटात आहे. इथे कुणाला पोलीस स्टेशन कुठे आहे, माहित असेल तर सांगा. कारण मला मिसिंगचा रिपोर्ट द्यायचा आहे. कारण 'मिसिंग लिंक इज मिसिंग'. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं मिसिंग लिंक आज बंद आहे. पुन्हा घाटात ट्राफिक आहे. एक - दोन गाड्या बंद पडलेल्या दिसत आहे. मिसिंग लिंकचं मिसिंग रिपोर्ट मला पोलीस स्टेशनमध्ये नोंदवायचं आहे. मिसिंग लिंक मिसिंग आहे', असं अभिजीत पानसे व्हिडीओत म्हणाले.
विकेंड असल्यामुळे लोणावळ्याच्या घाटात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी अनेकांनी हा मार्ग निवडला. मात्र, पु्न्हा एकदा पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. हा लिंक बंद असल्याने अनेकांनी जुन्या मार्गावर आपली गाडी वळवली. मात्र, या वळणावर अनेकांच्या गाड्या कडाक्याच्या उन्हात अडकल्या. अनेक प्रवाशांचे हाल झाले.