पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण राज्य हादरले असतानाच, सुरक्षित शहर म्हणवणाऱ्या पुणे शहरातही बालसुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांत शहरात पदपथावरून अडीच वर्षांच्या बालिकेचे अपहरण व खून करण्यापासून ते सुरक्षारक्षकानेच १५ वर्षीय मुलीला गरोदर करण्यापर्यंतचे संतापजनक प्रकार शहरात नुकतेच उघडकीस आले. शहरातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे पुण्यात लेकी सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
मालधक्का चौकात चिमुकलीचा खून :
नसरापूरप्रमाणेच पुण्यातील मालधक्का चौक परिसरातही असाच माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार घडला होता. पदपथावर आई-वडिलांसोबत झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून नराधमाने तिला रेल्वेच्या एका बोगीत नेऊन अमानुष मारहाण केली. तिच्या शरीराचे ठिकठिकाणी चावे घेतले. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत सापडलेल्या या बालिकेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुरक्षा रक्षकाकडून मुलीवर बलात्कार -
लक्ष्मीनगर भागातील एका सोसायटीत शैलेश कुमार (वय २५) या सुरक्षारक्षकाने एका १५ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. ‘तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,’ अशी तिला धमकी दिली. प्रकृती बिघडल्याने या मुलीला ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
दिव्यांग मुलीवर अत्याचार-
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने १५ वर्षांच्या दिव्यांग अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
अल्पवयीन मुलींना धमकावून बलात्कार -
चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्च २०२६ मध्ये दोन घटनांमध्ये अल्पवयीन मुलींना धमकावून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोघा आरोपींना अटक केली होती.
पोलिसांचा धाक संपलाय का?
पुणे शहरात २०२४ मध्ये ४९९ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या. तर ८४४ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. तसेच, २०२५ मध्ये ४७३ महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्या. तर ८३६ महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
शहरात अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना दररोज घडत आहेत. नसरापूरची घटना असो वा पुण्यातील घटना; घर, पदपथ किंवा सोसायटी, कुठेही आज लहान मुली आणि महिला सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांनी अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.