मुंबई : लोकसभेत महिला आरक्षणासाठीचं घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर महायुतीने 21 एप्रिलला मुंबईत मोर्चा काढला होता. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी महायुतीने मुंबईतील वरळीत संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा काढला. मात्र, या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली आणि या कोंडीत अडकलेली एक महिला चांगलीच संतापली. त्यावेळी तिेने चांगलाच राडा घातला. एवढंच नाहीतर तिथे उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांनाही सुनावलं होतं. ही महिला नेमकी कोण, याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
आता या महिलेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. टीना चौधरी, असं या महिलेचं नावं आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका, असं आवाहन या महिलेनं सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. सोबतच त्यावेळी केवळ गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होती, त्यांनी माझं म्हणणं किमान ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, असंही टीना चौधरी यांनी म्हटलं. त्यांच्या मदतीमुळेच आम्हाला यूटर्न घेता आला, असंही टीना चौधरी यांनी म्हटलं.
त्या घटनेनंतर मला अनेक मेसेज आले, सुरक्षेसंबंधी विचारणा करण्यात आली. त्याबद्दल सर्वांचे आभार, असंही टीना चौधरी यांनी म्हटलं.
टीना चौधरी म्हणाल्या की, "त्या दिवशी मी माझ्या मुलीला संगीत क्लासमध्ये सोडलं. घरी परतताना जवळपास 25 मिनिटे मी कारमध्ये होती. ट्रॅफिक जागेचं हलत नव्हतं, त्यावेळी मी कारमधून उतरले आणि कारण काय आहे ते पाहिलं. आमच्या कारच्या समोर बस पार्क करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढचे दीड तास मी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला विनंती करत होते. आमच्या समोरच्या बस जर हटवल्या तर ट्रॅफिक कमी होईल असं मी त्यांना वारंवार सांगत होते."
टीना चौधरी म्हणाल्या की, "मला पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद आला नाही, कुणीही मदत माझा आवाज ऐकला नाही. मी घरी कधी पोहोचणार याचा मला काहीही अंदाज नव्हता. गिरीश महाजन हे त्या रॅलीत एकमेव व्यक्ती होते, ज्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि नंतर त्यांच्याच निर्देशानंतर त्या दोन बस बाजूला करण्यात आल्या. त्यानंतर आम्ही यू टर्न घेऊन आमच्या घरी जाऊ शकतो."
माझ्या खांद्याचा वापर करून कोणत्या तरी राजकीय नेत्यावर निशाणा साधू नका. कारण तुम्ही सगळे राजकीय नेते या अशा गोष्टींसाठी कारणीभूत आहात, अशा शब्दात टीना चौधरी यांनी राजकारण्यांना सुनावलं.
टीना चौधरी म्हणाल्या की, "माझे आजोबा आणि वडिलांनी भारतीय लष्करात योगदान दिलं आहे. माझ्या कुटुंबातील असे आठ लोक आहेत ज्यांनी भारतीय लष्करात सेवा दिली आहे. तुम्ही एखादी वर्दी अंगावर घालता त्यावेळी तुम्ही लोकांच्या सेवेसाठी असता. कुणाचा अनादर करण्यासाठी तुम्ही वर्दी घालत नाही."
माझं कोणतंही सोशल मीडिया अकाउंट नाही. तरीही तुमचे सगळे मेसेज मी वाचले. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते, असं टीना चौधरी म्हणाल्या.