>> प्रा. समीर जाधव
marathidepartment1956@gmail.com
तुळजाजी राजे हे वडील राजे प्रतापसिंहांप्रमाणेच मराठी, संस्कृत आणि तेलुगू भाषेत पारंगत होते. त्यांच्याच राजवटीत ‘भागवत मेळा’ नाटकांचे सादरीकरण अत्यंत लोकप्रिय झाले, जे आजही टिकून आहे.
वैशाख शु. चतुर्दशी म्हणजे 30 एप्रिलला नृसिंह जयंती साजरी झाली. नृसिंह जयंतीच्या निमित्ताने तंजावर यथे भागवत मेळा या नृत्य-नाटकाचे सादरीकरण करण्यात येते. ‘प्रल्हाद चरित्र’ या भागवत मेळा नृत्य-नाटकाचे सादरीकरण म्हणजे तंजावरमधील मेलात्तूर आणि सलियमंगळ या दोन गावांचा धार्मिक विधीचाच एक भाग आहे. भागवत मेळा नाटकांच्या सादरीकरणाला चालना देण्यासाठी नृत्य-नाटकांच्या सादरीकरणासाठी होणारा खर्च, राजकोषातून करणारे तंजावरचे राजे म्हणजे तुळजाजी राजे भोसले होय. तुळजाजी राजे यांनी इ.स. 1786 मध्ये एक विशेष निधी राखून ठेवल्याची माहिती तंजावरच्या मोडी कागदपत्रातून मिळते. तुळजाजींच्या राजवटीत ‘भागवत मेळा नाटकांचे’ सादरीकरण अत्यंत लोकप्रिय झाले.
तुळजाजी राजे (दुसरे) यांनी इ.स. 1763 ते 1787 पर्यंत तंजावरवर राज्य केले. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तेही सर्व कलांमध्ये पारंगत होते. तुळजाजींनी प्रतापसिंह राजांच्या काळातील काही राज्यकारभारातील अधिकाऱयांना नोकरीतून कमी केले आणि काहींना कैद केले. जमावबंदीचा मुख्य कारभारी डबीरपंतची संपत्ती काढून घेतली आणि त्यालाही पदच्युत केले. रामनदच्या पाळेगारांनी तंजावरचा काही प्रदेश हस्तगत केला होता, तुळजाजींनी रामनदकरवर स्वारी करून तो प्रदेश परत मिळवला. रामनद हे कर्नाटकच्या नवाबाचे संस्थानिक होते. रामनदच्या स्वारीचा बदला म्हणून कर्नाटकच्या नवाबाने तंजावरवर स्वारी केली. इंग्रजांनी या स्वारीसाठी त्याला सहाय्य केले. यामुळेच इ.स. 1773 साली तंजावर कर्नाटकच्या नवाबाच्या आणि ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या सैन्याच्या ताब्यात गेले. परंतु इंग्लंडमधील कंपनीच्या संचालक मंडळाने कर्नाटकच्या नवाबाच्या आणि कंपनीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि इ.स.1776 मध्ये काही अटींवर तंजावरचे राज्य तुळजाजींना परत करण्याचे आदेश दिले.
पुढे 1784 साली टिपू सुलतानने तंजावरची लूट केली. 1200 मुलांचे अपहरण केले, प्रजेची जनावरे पळवली, कालवे नष्ट केले. टिपू सुलतानच्या या स्वारीमुळे तंजावरच्या प्रजेची दुर्दशा झाली. अनेक लोक हताश होऊन तंजावरमधून स्थलांतरित झाले. कर्नाटकच्या नवाबचे राज्य, टिपू सुलतानची स्वारी आणि तुळजाजींच्या राज्य कारभाराची धोरणे या तीन कारणांमुळे तंजावरच्या जनतेची अवस्था दयनीय झाली होती. यामुळे तुळजाजींच्या काळात खऱया अर्थाने तंजावरच्या राजकीय आर्थिक ऱहासाला सुरुवात झाली.
तुळजाजी राजे हे वडील प्रतापसिंहांप्रमाणेच मराठी, संस्कृत आणि तेलुगू भाषेत पारंगत होते. त्यांनी संस्कृत भाषेत काव्यरचना केली. अनेक मराठी आणि तेलुगू कवींना राजाश्रय दिला. तुळजाजी राजे यांनी आलुरी कुप्पण्णा या तेलुगू कवीला ‘आंध्र कालिदास’ ही पदवी बहाल केली. राम पंडित, कृष्ण अवधूत, शेषकवी, विरुपाक्ष गंगाधर, महादेव कवी, करपुतळ रत्नाकर आदी कवी तुळजाजी राजाच्या राजदरबारी होते. त्यांचा दरबार हे गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रांतील निष्णात कलाकारांचे माहेरघर बनले होते.
नृत्यकलेचे शास्त्रशुद्ध सादरीकरण करण्याच्या उद्देशाने, तुळजाजींनी तिरुनेलवेली येथील सुप्रसिद्ध नृत्यशिक्षक महादेव अन्नावी यांना तंजावरला बोलावून घेतले. महादेव अन्नावी हे तामीळ आणि तेलुगू भाषांमधील त्यांच्या कीर्तनांसाठी आणि ‘वर्ण’ रचनांसाठी विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्यासोबत तंजावरला आलेल्या ‘वनजाक्षी’ आणि ‘मुत्तुमनार’ या दोन नर्तकींनी तुळजाजींच्या दरबारात नृत्य सादर केले; त्यावेळी महादेव नट्टुवनार यांनी ‘भोसले तुळजेंद्र राजा’ या शब्दांनी सुरू होणारा ‘वर्ण’ गायला आणि नृत्याचे ‘नट्टुवांगम’ (ताल-लय-निर्देशन) केले. या सादरीकरणाने अत्यंत प्रसन्न होऊन, तुळजाजीने त्या नट्टुवनार यांना तंजावरमधील ‘वेस्ट मेन स्ट्रीट’ येथे एक भव्य घर, तसेच जमीन कायमस्वरूपी इनाम म्हणून दिली.
तुळजाजी राजेंच्या काळातच रेव्हरंड श्वार्ट्झ हे डॅनिश मिशनरीच्या मुख्यालयात तंजावर येथे आले. त्यांनी तुळजाजी यांच्या जीवनात व त्यानंतरच्या तंजावरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. इ.स. 1787 साली तुळजाजींचे निधन झाले. तुळजाजी राजेंच्या हयातीतच त्यांच्या मुलांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांनी आपला एक गोत्रज मुलगा दत्तक घेतला आणि सरफोजी दुसरा हे त्याचे नामकरण केले. सरफोजी दुसरा वयात येईपर्यंत अमरसिंह यांनी (प्रतापसिंह राजांचा दासीपुत्र) राज्य कारभार पाहावा असे निश्चित केले होते.
तुळजाजींच्या मृत्युपत्रानुसार अमरसिंह हे तंजावरचे राजे झाले. त्यांनी इ.स. 1787 ते 1798 पर्यंत तंजावरवर राज्य केले. रेव्हरंड श्वार्ट्झने ख्रिस्तीधर्माच्या उन्नतीच्या आशेने इ.स. 1798 साली तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या सहाय्याने अमरसिंहांना पदच्युत केले आणि सरफोजीराजेंना तंजावरच्या गादीवर बसविले. सरफोजींची कारकीर्द कशी होती याचा आढावा पुढच्या लेखात घेऊया.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)