Nagpur News: बारावीच्या परीक्षेत 'मास कॉपी'; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई
esakal May 03, 2026 07:45 PM

नागपूर: राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान तीन पेपरही फुटले होते. दरम्यान गोंदिया आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात जीवशास्त्राच्या पेपरदरम्यान ‘मास कॉपी’ केल्याचे २४३ विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत उघडकीस आले.

या विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च यादरम्यान झाली.तेव्हा सेंट उर्सुला येथे शिक्षकांच्या समयसुचकतेने केमेस्ट्रीचा व त्यानंतर गणित आणि फिजिक्सच पेपरही फुटल्याचे समोर आले.याप्रकरणी शिकवणी वर्ग संचालकांसह जयताळ्यातील एका शाळेचा संचालक आणि साथीदार अशा आठ जणांना अटक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.

अनुष्का शर्माकडे टीम इंडियाचे कर्णधारपद! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला 'अ' संघाची घोषणा; पाहा कोणा कोणाला मिळाली संधी

मात्र, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाशी गावातील जे. डी. चौधरी कॉलेजमध्ये ११८ विद्यार्थ्यांनी तर गोंदिया जिल्ह्यातील कातुली येथील माऊली कनिष्ठ महाविद्यालयात १२५ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये कॉपी केल्याची पेपर तपासणीत उघड झाले. या विद्यार्थ्यांवर कारवाई करीत अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे डॉ. पटवे यांनी सांगितले.

शिक्षकांवरही कारवाई

विभागीय शिक्षण मंडळाकडून जीवशास्त्राचा पेपर तपासल्यावर त्यांना दोन केद्रांवरील २४३ विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये एकसारखे उत्तर लिहिले असल्याचे आढळले. ही माहिती मॉडरेटरला देण्यात आल्यावर त्यांनी बोर्डाला कळविले. त्यातून चौकशी समिती लावून या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या केंद्रावरील सर्वच शिक्षकांची चौकशीचे आदेश व ही केंद्रे तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Latest Marathi News Live Update : मोताळा तालुक्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग; हजारो झाडे जळून खाक गडचिरोलीत ४२ विद्यार्थ्यांकडून कॉपी

परीक्षेदरम्यान गडचिरोलीतील जा. क्र. बोमलवार कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रावर भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत ४२ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यांच्यावरही कारवाई करीत त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. हे केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती डॉ.पटवे यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.