चालकाच्या छातीत अचानक कळ आल्याने बस कलंडून 24 प्रवासी जखमी
Tv9 Marathi May 03, 2026 07:45 PM

ड्रायव्हरला अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस हायवेवर अनियंत्रित होऊन उलटल्याने २४ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे घडली आहे. या जखमीत ड्रायव्हरचा देखील समावेश आहे. प्रथमदर्शनी मिळाल्या माहितीनुसार ड्रायव्हरच्या छातीत जोरात कळ आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

वृत्त संस्थानी दिलेल्या बातमीनुसार हा अपघात हिमाचल प्रदेशातील नुरपूर उपमंडळ अंतर्गत येणाऱ्या पठाणकोठ – मंडी राष्ट्रीय महामार्गावर घडला. रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास चंबा ते ऊना येथे बस जात होती. ही बस जशी नुरपूर भागात पोहचली तशी ड्रायव्हरची तब्येत अचानक बिघडली. ड्रायव्हरच्या छातीत अचानक कळ आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटली. यामुळे घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. प्रवाशांच्या ओरडण्याने आणि किंचाळ्यांनी स्थानिकांनी घटना स्थळी धाव घेतली.

जखमींवर नुरपूर सिव्हील रुग्णालयात उपचार

स्थानिक लोकांनी घटनास्थळी येऊन जखमी प्रवाशांसाठी मदतकार्य सुरु केले. ग्रामीण आणि पादचाऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाच्या टीम घटनास्थळी पोहचल्या. सर्व जखमींना तातडीने नुरपूर सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात २४ लोक जखमी झाले असेल तरी त्यातील चार लोक गंभीर रुपाने जखमी झाले आहेत. गंभीर जखमी प्रवाशांना चांगल्या उपचारांसाठी कांगडा येथील डॉ.राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज, टांडा येथे हलवण्यात आले आहे. तर उर्वरित २० जखमींवर नुरपूर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याची माहीती डॉक्टरांनी दिली आहे.

अपघाताची चौकशी सुरु

सुरुवातीच्या तपासानुसार या अपघाताला चालकाची अचानक बिघडलेली तब्येत जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. तरीही अपघाताला अन्य कारणे जबाबदार आहेत का याची देखील चौकशी केली जात आहे. प्रशासनाने जखमींना सर्व शक्य तितकी मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहेत. पोलिस या अपघाताची पुढील चौकशी करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.