Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार
esakal May 04, 2026 12:45 AM
बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

पुणे -

बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

बारामती येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मतमोजणीला होणार सुरुवात

२३ एप्रिल रोजी बारामती मध्ये ५८.२७ टक्के झालं मतदान

ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल, तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबलांची व्यवस्था

या प्रक्रियेसाठी ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० मतमोजणी पर्यवेक्षक, ३० मतमोजणी सहायक तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक 532, हरताळा नियतक्षेत्रात आग

मुक्ताईनगर वनपरिक्षेत्रात कक्ष क्रमांक 532, हरताळा नियतक्षेत्रात आग लागल्याची घटना घडली .

Neelam Gorhe: नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

सोशल मीडियावर वाढत चाललेल्या बेजबाबदारपणाबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः पोक्सो प्रकरणांमध्ये निरपराध मुलींचे फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केले जात असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.

“आजकाल सोशल मीडियावर कोणतीही माहिती पडताळणी न करता टाकली जाते. पोक्सोमधील पीडित मुलींचे फोटो सापडले नाहीत तर दुसऱ्याच मुलींचे फोटो वापरून त्यांना पीडित म्हणून दाखवले जाते, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे अश्लीलता आणि स्त्रीशोषणाला चालना मिळत आहे. लहान वयातील मुलेही हे सर्व पाहत आहेत, पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याची गरज आहे.”

गुन्हेगारीच्या आकडेवारीचा उल्लेख करत गोरे म्हणाल्या की, “२०१४ पूर्वी सोशल क्राईममधील गुन्ह्यांचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांच्या दरम्यान होते. मात्र २०१४ नंतर हे प्रमाण सुमारे ३५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण अजूनही अपेक्षेपेक्षा कमी आहे.”

कडक कारवाईची मागणी करत त्या म्हणाल्या, “अशा गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत गुन्हेगारांना भीती वाटत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही आणि निगराणी वाढवली तर गुन्हेगारांवर काही प्रमाणात अंकुश ठेवता येईल.”

समाजातील प्रत्येक घटकाने सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले..

Delhi News: पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमध्ये भाजप तर केरळ आणि तामिळनाडूत NDAचे सरकार येणार - भाजप नेते अजय आलोक

भाजप नेते अजय आलोक म्हणाले, "...NDA ची कामगिरी अत्यंत शानदार असेल... पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजप सरकार स्थापन करेल, तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये NDA सरकार स्थापन करेल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 'नॉर्थ टेक सिम्पोजियम २०२६' मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 'रक्षा त्रिवेणी संगम' ही संकल्पना असलेल्या 'नॉर्थ टेक सिम्पोजियम २०२६' मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. विमानतळावर लष्करप्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी संरक्षण मंत्र्यांचे स्वागत केले.

Mumbai: अत्याचार, बलात्कार आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जातेय - खासदार अरविंद सावंत

पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत म्हणाले, "मला अत्यंत दुःख आणि संताप झाला आहे... अत्याचार, बलात्कार आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जात आहे... अवघ्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. आपण महाराष्ट्राला नक्की कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत?... गुन्हेगारांना हे चांगलेच ठाऊक आहे की, एखाद्या पक्षात प्रवेश केल्यास ते 'पवित्र' होतील..."

Alibag Live : अलिबाग–वडखळ मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; पर्यटक तासन्तास अडकले

अलिबाग वडखळ मार्गावर सुट्टी संपल्यानंतर परतणाऱ्या पर्यटकांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई–पुण्याकडे परत निघालेल्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने रस्त्यावर तासन्तास ट्रॅफिक जाम पाहायला मिळत आहे.

Live : संगमनेरमध्ये शिंदेंच्या स्वागतावेळी हायहॉल्टेज ड्रामा; कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ

एकनाथ शिंदे यांचे आज संगमनेर येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सत्यजीत तांबे आणि अमोल खताळ हे दोन्ही आमदार हेलिपॅडवर उपस्थित होते. शिंदे यांच्या आगमनावेळी हेलिपॅड परिसरात हायहॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. स्वागतासाठी दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. नाव मराठीत लिहा

समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांना 10 मे पर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश...

ED कडून काका कोयटे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश.

समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली 100 बनावट खाती.

मोताळा तालुक्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग; हजारो झाडे जळून खाक

अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गाव शिवारात राबविण्यात येत असलेल्या मियावाकी पद्धतीच्या हरित उपक्रमाला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गेल्या पाच वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून उभा राहिलेला हा प्रकल्प काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेड लपालीचे सरपंच प्रवीण कदम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे 20 ते 25 एकर क्षेत्रात चर खोदून हजारो वृक्षांची लागवड केली होती.

Thane Live: मुरबाडच्या काळू धरणाबाबत पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील प्रस्तावित असलेल्या काळू धरणाच्या कामाला गती दिली असून बाधित शेतकऱ्याना विश्वासात घेऊन त्यांचे सहकार्य मिळत असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी मार्गदर्शन करताना केलं. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परिसरातील सर्व स्थानिक शेतकरी यांनी एकत्र येत धरणाला ठाम विरोध करण्याचा निर्धार केला. यावेळी बाधित क्षेत्रातील शेतकरी निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Kalyan Live : कल्याण पूर्वेत वाहतूक पोलिसावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pune Live : नसरापूर प्रकरणात पोलिसांची कारवाई; आरोपी भीमराव कांबळेच्या घरावर नोटीस

नसरापूर प्रकरणात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून, आरोपी भीमराव कांबळे यांच्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे.

Pune Live : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू झाला आहे.

Yavatmal Live : शिरोलीत पक्ष्यांसाठी पाणवठे ठरले जीवनदायी; उन्हाळ्यात दिलासा

यवतमाळ जिल्ह्यातील शिरोली परिसरात वाढत्या उन्हाळ्यामुळे मानवांसह पशुपक्षीही त्रस्त झाले आहेत. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने पाण्यासाठी भटकणाऱ्या पक्षांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत उभारलेले पाणवठे पक्ष्यांसाठी जीवनदान ठरत असून त्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

Hingoli Live : हिंगोलीच्या वसमत शहरात डिझेलचा तुटवडा, नागरिकांनी डिझेलसाठी लांबलचक रांगा

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावल्याचे चित्र शहरात दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर भागांत मात्र पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती पेट्रोल असोसिएशनने दिली आहे. पेट्रोल-डिझेल कंपन्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून वसमत येथे डिझेलचा साठा कमी प्रमाणात पाठवला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच डिझेलसोबत अतिरिक्त पेट्रोल घेण्याची अट पेट्रोल कंपन्या घालत असल्याचे पेट्रोल व्यावसायिकांनी सांगितले आहे.

Pune Live : नसरापूर प्रकरणावरुन पुण्यात एकनाथ शिंदे गटाचे आंदोलन

नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाच्या स्वरूपात आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या हे आंदोलन करत आहेत.

Solapur Live : सोलापूरच्या बोरामणीतील तिहेरी हत्या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

मृत गायत्री मस्के हिने संपत्तीतील आपल्या हक्काच्या वाट्यासाठी तसेच आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला हातउसने दिलेल्या २५ लाख रुपयांच्या परतफेडीसाठी वारंवार मागणी केली होती. या मालमत्तेच्या वादातूनच हे तिहेरी हत्याकांड घडल्याची नातेवाईकांनी तक्रार केली आहे. या प्रकरणात दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. बीएनएस कलम १०३(अ), ३५१(२), ३, ५ तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pandharpur Live : पंढरपुरातील हॉटेल व्यावसायिकांना गॅस दरवाढीचा मोठा फटका

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत अचानक झालेल्या मोठ्या वाढीमुळे शहरातील लहान हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. सरकारने सुमारे ९३३ रुपयांची वाढ केल्याने त्यांच्या एकूण खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. हॉटेल चालकांचे म्हणणे आहे की गॅस दरवाढीमुळे उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने ग्राहकांकडून आकारण्यात येणारे दर वाढवणे त्यांना भाग पडणार आहे.

Delhi Live : विवेक विहार येथे लागलेली आगीच्या घटना अत्यंत दुर्दैवी- दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा

वीरेंद्र सचदेवा म्हणाले की,"ही अत्यंत दुःखद घटना आहे. प्राप्त माहितीनुसार, एका एसी (AC) युनिटमध्ये स्फोट झाला होता. पोलिसांना पहिला फोन पहाटे ३:४५ च्या सुमारास आला आणि अग्निशमन दलाचे पहिले वाहन पहाटे ३:५२ वाजता घटनास्थळी पोहोचले. या घटनेत सुमारे २० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला. मी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून, तेथील दृश्य खरोखरच हृदयद्रावक आहे.

Pune Live : कोणीही राजकारणी आम्हाला भेटायला येऊ नका- नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भूमिका

माझ्या मुलीला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत कोणीही राजकीय व्यक्तीने आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये.राजकीय पुढारी भेटायला येतात, फोटो काढतात.. स्वतःच राजकारण साध्य करतात.. त्यामुळे त्यांनी येऊ नये असे नसरापूर प्रकरणा

Pune Live : खासदार मेधा कुलकर्णी नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेणार

नसरापूर पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आज सकाळी डिएसके विश्व येथील घरी भेट देणार आहेत.

नवी मुंबईत जुईनगर हायवेवर पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

नवी मुंबईत जुईनगर हायवेवर पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

नवी मुंबईतील जुईनगर हायवेवर सुरू असलेल्या तुर्भे-खारघर टनलच्या बांधकामादरम्यान गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे. पृथ्वी कंपनीकडून सुरू असलेल्या या कामात हायड्रा मशीनच्या चुकीमुळे एमआयडीसी आणि महापालिकेची मुख्य जलवाहिनी तुटली आहे.

धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई

धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई

अनेक पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल नसल्याने बंद, शेती मशागतीची कामे ठप्प

दररोज दैनंदिन कामालाही मोठा फटका, पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने नागरिक संतप्त

बीड जिल्ह्यातून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहन चालक धाराशिव मध्ये पोहोचले

लातूरमध्ये तापमानाचा पारा 43 अंश पार, बैल जोडीचा "हीट स्ट्रोकने" मृत्यू

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये तापमानाचा पारा 43 अंश पार, बैल जोडीचा "हीट स्ट्रोकने" मृत्यू

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे, तापमानाचा पारा 43 अंश सेल्सिअस च्या पुढे गेलाय, रणरणत्या उन्हाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाही बसताना पाहायला मिळतोय,सावरी येथील शेतकरी मदन भंडारे यांची दीड लाखाची बैल जोडी "हिट स्ट्रोकने" दगावली आहे.

दिवसभर शेत मेहनतीचे काम करून सायंकाळी पाणी पाजून बैल दावणीला बांधले होते ,मात्र दोन्हीही बैल मृत अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली, वैद्यकीय माहितीनुसार बैलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने हिट-स्ट्रोकचा बैल जोडीला फटका बसून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकरी भंडारे यांच तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाल आहे, जिल्ह्यात आत्तापर्यंत उष्माघाताने तीन मानवी मृत्यू झाले आहेत.

नागपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू उष्माघाताने मृत्यू

नागपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू उष्माघाताने मृत्यू

- नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशन हद्दीत तिघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय

- सदर परिसरात 58 वर्षीय,यशोधरानगर परिसरात 60, आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आस्था निवारा येथे वास्तव्यास असलेल्या 65 वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळले

- तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

- हे तीनही मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,मात्र मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मॉर्टम नंतरच स्पष्ट होणार

राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची घेतली दखल

राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची घेतली दखल

राष्ट्रीय महिला आयोगाकडून नसरापूर घटनेचा "सु मोटो कॉग्निजन्स"

राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील घटनेची घेतली दखल

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स यांना या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर देखरेख ठेवण्याचे आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आयोगाकडून आवाहन

पीडित कुटुंबाला तातडीने मदत व नुकसानभरपाई देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न

वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलद सुनावणी सुनिश्चित करण्यावरही आयोगाकडून भर

दोन दिवसांत अंबाबाईचरणी दोन लाख भाविक

Latest Marathi Live Updates 03 may 2026 : दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच भाविकांचा महासागर उसळला. उन्हाळी सुट्या आणि सलग आलेल्या सुट्यांमुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत तब्बल दोन लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.