अरे पकडा पकडा… ही तर महिला आहे… रेप फेस्टिव्हलमुळे लोक भडकले, पीडितेने जे सांगितलं त्याने जग हादरलं
GH News May 04, 2026 01:11 AM

नायजेरिया मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अहवालानुसार, रस्त्यांवर महिलांचा पाठलाग करण्यात आला आणि काही तरुणांनी त्यांच्यावर कथित लैंगिक अत्याचार केले. काहींनी तर या घटनेला रेप फेस्टिव्हल असे म्हटले आहे. ही घटना मार्च महिन्यात डेल्टा स्टेट मध्ये अलुए-डो फेस्टिव्हल दरम्यान घडली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा उत्सव प्रजननाशी संबंधित असून तो ओरामुडू समुदायाकडून साजरा केला जातो असेही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फ्रान्स 24 च्या अहवालानुसार, या उत्सवात सार्वजनिक ठिकाणी पुरुषांनी महिलांचा पाठलाग सुरू केला त्यावेळी वातावरण भयावह बनले. काही महिलांनी आरोप केला की त्यांच्या कपडे फाडण्यात आले आणि त्यांनी जबरदस्तीने निर्वस्त्र केले गेले, त्यानंतर त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेवेळी अनेक लोक उपस्थित होते, मात्र त्यांनी हा प्रकार रोखण्याऐवजी उलट घोषणाबाजी केली. या घटनेत मोठ्या संख्येने पुरुषांचा सहभाग होता, तसेच काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश होता.

पीडितेने सांगितली आपबीती

या घटनेतील पीडित महिलांमध्ये जवळच्या विद्यापीठातील काही विद्यार्थिनींचाही समावेश आहे. या घटनेनंतर काही महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, ‘मी मोटरसायकलवरून त्या भागात पोहोचली आणि काही वेळातच माझ्यावर हल्ला झाला. गर्दीतल्या लोकांनी मला पाहताच तिला पकडा असा आवाज दिला. ते मधमाश्यांसारखे माझ्यावर तुटून पडले. माझे कपडे ओढून पूर्णपणे फाडले गेले. माझ्या शरीराला अयोग्य प्रकारे स्पर्श केला. मी मदतीसाठी जोरात ओरडत होते. शेवटी एका व्यक्तीने माझी सुटका केली. त्याने हस्तक्षेप करून गर्दीतून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेदरम्यान फोनही हिसकावून घेण्यात आला.’

अनेकांना अटक

डेल्टा स्टेट पोलिसांनी सांगितले की, ‘या प्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक समुदायातील एक नेता आणि चार तरुणांचा समावेश आहे.’ महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या पदाधिकारी रीटा आयकी यांनी म्हटले, ‘जेव्हा लोक उघडपणे अशा प्रकारची कृत्ये करत आणि इतर लोक ते तमाशा म्हणून पाहतात, तेव्हा हा विषय केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित राहत नाही. यातून समाजाची मानसिकता समोर येते.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.