Mamata Banerjee vs Suvendu Adhikari : वाघिणीशी लढाई, सुवेंदू अधिकारी यांनी कुठल्या राऊंडमध्ये आघाडी घेणार ते आधीच सांगितलं
Tv9 Marathi May 04, 2026 02:45 PM

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरच्या निकालावर सगळ्या मीडियाचं बारीक लक्ष आहे. इथे बंगाल निवडणुकीतील हाय प्रोफाईल लढाई आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा सामना आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजपने इथून त्यांचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे. ते सुद्धा भाजपचा संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. त्यामुळे ममता विरुद्ध सुवेंदू या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. भाजपसाठी ममता बॅनर्जी यांना सत्तेतून हटवणं हे मुख्य टार्गेट आहे.

“मला भवानीपूरमधूनअजून अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. पहिल्या राऊंडमध्ये मुस्लिम बूथ आहेत. सहाव्या-सातव्या राऊंडपासून हिंदू बूथवरील काऊंटिंग सुरु होईल. भवानीपूरमधून माझ्यासाठी चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा आहे. सगळे चॅनल्स दाखवतायत की, मी आघाडीवर आहे. नंदीग्राममध्ये मला अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. मला तीनपट जास्त मतं मिळाली आहेत. भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार बनवेल अशी मला अपेक्षा आहे” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. भवानीपूरमध्ये भाजपने त्यांना तृणमुल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक मैदानात उतरवलं आहे.

काँटे की टक्कर

“भाजप सरकार बनवणार. प्राथमिक कल आहेत, त्यानुसार भाजप 135 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तृणमुल काँग्रेस जवळपास 100 जागांवर पुढे आहे. सुरुवातीला भवानीपूरमध्ये काँटे की टक्कर दिसेल. पहिल्या राऊंडच्या मतमोजणीत 14 बूथ पैकी 6 मुस्लिम बहुसंख्य असलेले बूथ आहेत. त्यांना तिथे 90 ते 95 टक्के मतं मिळायची. पण यावेळी असं होणार नाही” असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. “यावेळी तडा गेलाय. हिंदू बहुसंख्य असलेल्या 8 बूथवर मी आघाडीवर आहे. 9-10 व्या फेरीनंतर मी भवानीपूरमधून आघाडीवर असेन” असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे.

हे आमच्यासाठी चांगलं चिन्ह

“प्रस्थापित सरकार विरोधात लाट आहे. हिंदुंची एकगठ्ठा मत भाजपच्या बाजूने आहेत. हे आमच्यासाठी चांगलं चिन्ह आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूरमध्ये मुस्लिम मतांची विभागणी झालीय” असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.