ज्यांनी ममतादीदींना सत्तेपर्यंत पोहोचवलं, तेच आता खुर्ची खेचणार? भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चर्चेतील चेहरा, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?
जयदीप मेढे May 04, 2026 03:13 PM

West Bengal news CM BJP: पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना थेट टक्कर देणारे एकमेव नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करत कोलकाता ते दिल्लीपर्यंत खळबळ उडवली होती. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांचा हा पहिलाच विधानसभा पराभव होता. याच ममता बॅनर्जी यांनी एकेकाळी दिग्गज नेते सोमनाथ चटर्जी यांना पराभूत करत राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडली होती. सध्याच्या निवडणुकीत सुवेंदू अधिकारी नंदीग्रामसोबतच भवानीपूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत, जिथे ममता बॅनर्जीही मैदानात असल्याने ही लढत अधिकच रंगतदार ठरत आहे. तर सकाळपासून समोर आलेल्या कालानुसार भाजपची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू झाली आहे.(West Bengal news CM BJP)

West Bengal news CM BJP:  भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सुवेंदू अधिकारी हे सध्या पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख चेहरे मानले जातात. भाजपला सत्ता मिळाल्यास ते मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीचे दावेदार असतील. अविवाहित असलेले सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये काम करत मोठे यश मिळवले, मात्र मतभेदांमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

West Bengal news CM BJP: अमित शाह यांचे निकटवर्तीय

५५ वर्षीय सुवेंदू अधिकारी हे भाजपमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी २००९ ते २०२४ दरम्यान काँग्रेसचे खासदार होते आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्रीही होते. त्यांचे भाऊ दिव्येंदू आणि सौमेंदू अधिकारी हेही लोकसभा सदस्य राहिले आहेत.

West Bengal news CM BJP: पूर्व मिदनापूरमधील प्रभावशाली राजकीय घराणे

सुवेंदू अधिकारी हे प्रभावशाली राजकीय कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पूर्व मिदनापूर (पुरबा मेदिनीपूर) जिल्ह्यात मोठा दबदबा असून त्यांना या भागातील ‘राजकीय सम्राट’ असेही म्हटले जाते.

West Bengal news CM BJP: काँग्रेसमधून राजकीय प्रवासाची सुरुवात

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला आणि कांथी नगरपालिका येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २००६ मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले.

West Bengal news CM BJP: नंदीग्राम आंदोलनातून ओळख निर्माण

२००७ मध्ये नंदीग्राम आंदोलनात त्यांनी ममता बॅनर्जींसोबत नेतृत्व करत स्वतःची ‘फायरब्रँड’ नेता म्हणून ओळख निर्माण केली. त्या वेळी इंडोनेशियाच्या सलीम समूहाच्या रासायनिक प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात १४ मार्च २००७ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १४ आंदोलकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली. अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्यात आला. नंदीग्राम आणि सिंगूर येथील आंदोलनांमुळे २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि डाव्या आघाडीच्या ३४ वर्षांच्या सत्तेला पूर्णविराम मिळाला.

West Bengal news CM BJP: ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी

या यशानंतर सुवेंदू अधिकारी यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले. त्यांनी २००९ आणि २०१४ मध्ये तामलुक मतदारसंघातून विजय मिळवला आणि ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी बनले. २०१६ मध्ये तृणमूलच्या पुनर्विजयानंतर त्यांना राज्यात बोलावून परिवहन खात्यासह इतर महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली.

West Bengal news CM BJP: तृणमूलमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातील वाढता प्रभाव आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबतचे मतभेद यामुळे त्यांची ताकद कमी झाली. २०१९ नंतर मतभेद अधिक तीव्र झाले आणि नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत करून त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.