Tamil Nadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी (Tamil Nadu Election Result 2026) संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. तामिळी सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या तमिळगा वेत्री कझगम (TVK) पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत 100 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, गेल्या 59 वर्षांपासून (1967 नंतर) तामिळनाडूच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही प्रस्थापित पक्षांना मागे सारून विजय यांनी 'किंग' म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून विजय 'किंगमेकर' ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, विजय यांनी सर्व प्रस्थापित पक्षांपासून अंतर राखत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जनतेला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या घोषणा, अत्याधुनिक प्रचार यंत्रणा आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिलेली उमेदवारी यामुळे 'टीव्हीके' घराघरात पोहोचला. भाजपने एआयएडीएमकेसोबत युती करण्यासाठी दबाव आणला होता, तर कार्यकर्त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा आग्रह धरला होता, परंतु विजय यांनी कोणाचेही न ऐकता आपली स्वतंत्र वाट निवडली आणि आज त्यांना मोठे यश मिळाले आहे.
तामिळनाडूत काँग्रेसला मोठा फटका बसला असून आमदारांची संख्या 14 वरून 4 वर घसरली आहे. या पराभवामागे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांचे म्हणणे डावलणे हे मुख्य कारण मानले जात आहे. राहुल गांधी यांचा थलपती विजयबद्दल सुरुवातीपासूनच सकारात्मक कल होता. डीएमकेसोबतचे अंतर वाढवून 'टीव्हीके'सोबत युती करावी, असे राहुल गांधींना वाटत होते. मात्र, पी. चिदंबरम आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी डीएमकेसोबतच राहण्याचा आग्रह धरला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्रात जी चूक काँग्रेस नेत्यांनी केली, तीच तामिळनाडूत पुनरावृत्ती झाली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊ नये, असे राहुल गांधींचे मत होते. मात्र, स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे तिथे युती झाली आणि काँग्रेसची मोठी हानी झाली. तीच परिस्थिती तामिळनाडूत ओढवली आहे. जर काँग्रेसने राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार थलपती विजयसोबत हातमिळवणी केली असती, तर आज काँग्रेस तामिळनाडूच्या सत्तेत वाटेकरी असती. विजय आणि राहुल गांधी यांचे वैयक्तिक संबंध उत्तम आहेत. स्वतः विजय यांनीही राहुल गांधींच्या नेतृत्वाचे कौतुक केले होते. मात्र, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे ही संधी गमावली आणि आता थलपती विजय तामिळनाडूचे नवे 'भाग्यविधाते' म्हणून समोर आले आहेत.
आणखी वाचा