मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निकालाचे अंतिम कल हाती आले असून तृणमूलच्या ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांचे गड उद्ध्वस्त झाल्याचं दिसून येतंय. पश्चिम बंगालमध्ये भाजपने दोन तृतियांश जागा जिंकल्या असून पहिल्यांदाच सत्ता मिळवली आहे. तर तामिळनाडूमध्ये सुपरस्टार थलापती विजयने करिश्मा दाखवत बहुमताकडे वाटचाल केल्याचं दिसतंय.
पाच राज्यांची निवडणूक गाजली ती काही प्रमुख नेत्यांमुळे. त्यामध्ये ममता बॅनर्जी, हिमंता बिस्वा सरमा, एम के स्टॅलिन, थलापती विजय, शुभेंदु अधिकारी यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या शुभेंदु अधिकारी यांचं आव्हान आहे. या ठिकाणी 13 व्या फेरी अखेर ममता बॅनर्जी या सुभेंदु अधिकारी यांच्यापेक्षा जवळपास साडेपाच हजार मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे.
ममता बॅनर्जी आणि शुभेंदु अधिकारी हे एकाचवेळी भवानीपूरमधील मतमोजणीच्या ठिकाणी आल्यानंतर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.
ममता बॅनर्जी यांच्या कट्टर विरोधक आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार समजले जाणारे शुभेंदु अधिकारी हे भवानीपूरमधून मागे असले तरी नंदीग्राममधून त्यांनी मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे.
गेल्या वर्षी तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या हुमायू कबीर हे त्यांच्या रेजीनगर आणि नौदा या दोन्ही मतदारसंघांतून आघाडीवर आहेत. हुमायू कबीर यांनी उन्नयन पार्टी नावाने पक्षाची स्थापना केली आहे.
आसाममधील जलुकबारी विधानसभा मतदारसंघातून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विजय संपादन केला आहे. आसाममध्ये 101 हून अधिक जागा मिळवत भाजपने हॅट्रिक साधली आहे.
आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जोरहाट मतदारसंघातून आसाम विधानसभा निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते गौरव गोगोई जवळपास 23,000 मतांनी पराभूत झाले. भाजपचे हितेंद्र नाथ गोस्वामी यांनी 69,439 मते मिळवून ही जागा जिंकली.
तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी आपली कोलाथूर जागा गमावली आहे. ही जागा त्यांचा बालेकिल्ला मानली जात होती, जिथे त्यांनी 2011,2016 आणि 2021 मध्ये सातत्याने विजय मिळवला होता. यावेळी, त्यांचे दीर्घकाळचे सहकारी आणि विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी त्यांचा पराभव केला.
थलापती विजय हा पेरांबूर आणि त्रिची या दोन ठिकाणी लढत असून दोन्ही ठिकाणी त्यांने निर्णायक आघाडी घेतल्याची माहिती आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष बनला आहे.
ही बातमी वाचा: