Sairat film actor wedding: 'सैराट ' चित्रपट होऊन आता 10 वर्षे झाली तरी या चित्रपटातील स्टारकास्ट प्रेक्षकांच्या जशीच्या तशी लक्षात आहे. आर्ची, परश्या, लंगड्या, सल्या या चौघांच्याही भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या . आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतेच. आता सैराट चित्रपटात 'सल्या ' ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेखने लग्न केले आहे. त्याने नुकतेच त्याच्या पत्नीसोबत निकाहाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना खुशखबर दिली. त्याच्या पोस्टखाली रिंकू राजगुरुनेही प्रतिक्रिया दिलीये.
सैराट चित्रपटात ' सल्या ' ही भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याने त्याच्या गर्लफ्रेंडशी म्हणजेच सिमरनशी निकाह केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही पारंपारिक वेशात दिसतायत. अरबाजने क्रीम कलरची शेरवानी घातली आहे. तर त्याची बायको सिमरनने तशाच रंगाची साडी नेसली आहे. त्याने या पोस्ट खाली ' जस्ट अस ' असं म्हटलंय. यावर अनेक कलाकारांनी व मनोरंजन सृष्टीतील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
लग्न झाल्याचं कळताच त्याच्या पोस्ट खाली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने हार्ट इमोजी टाकत दोघांना शुभेच्छा दिल्याचे दिसतंय. रिंकू आणि अरबाजने सैराट या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नंतर अरबाज मटका किंग या वेब सिरीजमध्ये झळकला. शिवाय पिक्चर बॉईज या चित्रपटातही त्याची भूमिका आहे.चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अरबाज आणि सिमरन गेल्या 3-4 वर्षांपासून एकमेकांसोबत होते. अखेर त्यांनी निकाह करून त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
‘सैराट’नंतर अरबाजने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिरयानी, झुंड, एकदम कडक अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने विविध छटा असलेल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. केवळ चित्रपटांपुरताच मर्यादित न राहता, प्राइम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मटका किंग’ या विजय वर्माच्या मालिकेतही तो दिसला. अभिनयासोबतच अरबाजने व्यवसाय क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ त्याने ‘बेक बडीज’ नावाचं केक आणि कॅफे सुरू केलं आहे.