पश्चिम बंगाल जिंकणाऱ्या शुभेंदु अधिकारी यांनी लग्न का केलं नाही? कुटुंब, राजकीय प्रवास आणि मोठ्या निर्णयामागची कारणं
अभिजीत जाधव, एबीपी माझा, मुंबई May 04, 2026 09:13 PM

मुंबई : जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आला आहे. तृणमुल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला आणि एकहाती सत्ता मिळवली. भाजपची अनेक वर्षांची रणनीती कामाला आली. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांसह अनेक नेते बंगालमध्ये तळ ठोकून होते. पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच. पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात शुभेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. “अंग-बंग आणि कलिंग” अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्नही यानिमित्तानं पूर्ण झालं. 

पश्चिम बंगालच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते शुभेंदु अधिकारी हे सध्या भाजपचे प्रभावशाली चेहरे मानले जातात. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी असलेले शुभेंदु अधिकारी आता त्यांच्या कट्टर राजकीय प्रतिस्पर्ध्यांपैकी एक आहेत. मात्र, एक गोष्ट दोघांमध्ये समान आहे... दोघांनीही लग्न केलेले नाही.

शुभेंदु अधिकारी यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग सार्वजनिक आणि राजकीय कार्यासाठी समर्पित केला आहे. त्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता दिसून येते.

Suvendu Adhikari Why Not Married : लग्न न करण्यामागचं कारण काय?

शुभेंदु अधिकारी यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे की त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. त्यांचा राजकीय प्रवास 1987 मध्ये विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाला. त्यानंतर ते पूर्णपणे सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. त्यांच्या आयुष्यावर सतिश समंता, सुशील धारा आणि अजय मुखर्जी या स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा प्रभाव होता.

या तिघांनीही अविवाहित राहून समाजसेवा केली होती. त्यांच्याच प्रेरणेने शुभेंदु अधिकारी यांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतलं.

Suvendu Adhikari Family Background: अधिकारी कुटुंबात कोण-कोण?

शुभेंदु अधिकारी यांचं कुटुंब पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रभावशाली मानलं जातं. वडील शिशिर कुमार अधिकारी हे केंद्रात मंत्री राहिले आहेत. भाऊ दिबीयेंदू अधिकारी आणि सौमेंधू अधिकारी हेही सक्रिय राजकारणात आहेत. पूर्व मेदिनीपूर भागात अधिकारी कुटुंबाचा मोठा राजकीय प्रभाव पाहायला मिळतो.

Suvendu Adhikari Political Journey: शुभेंदु अधिकारी यांचा राजकीय प्रवास

जन्म: 15 डिसेंबर 1970, कांथी (Contai), पूर्व मेदिनीपूर
राजकीय सुरुवात : विद्यार्थी राजकारणातून
पक्ष : सुरुवातीला तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress), नंतर भाजप (Bharatiya Janata Party)
2007 : नंदीग्राम आंदोलनामुळे (Nandigram Movement) त्यांना मोठी ओळख मिळाली.
2009 : पहिल्यांदा खासदार म्हणून निवड
2016 : नंदीग्राममधून आमदार
2020 : TMC सोडून भाजपमध्ये प्रवेश
2021 : नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आले. 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.