Baramati Assembly By-Election Results : बारामती पोटनिवडणुकीत नोटाला तब्बल एवढी मतं
Tv9 Marathi May 04, 2026 10:45 PM

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर आज या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. सुनेत्रा पवार यांचा या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय झाला आहे. सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंतचे सर्व विजयाचे रेकॉर्ड तोडले आहेत. सुनेत्रा पवार यांचा या मतदारसंघातून तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी विजय झाला आहे. एकूण मतदानापैकी तब्बल 97.81 टक्के मतदान हे सुनेत्रा पवार यांना झालं आहे.  दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले होते.

सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. मात्र महायुतीच्या प्रयत्नांना यश आलं आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र जरी काँग्रेसने माघार घेतली तरी देखील काही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात निवडणूक झाली.  सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 22 अपक्ष उमेदवार उभे होते. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे. तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत.

मात्र दुसरीकडे या निवडणुकीत नोटाला देखील मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. नोटाला तब्बल 774 मतदान झालं असून, या निवडणुकीत नोटा तिसऱ्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमाकांवर अपक्ष उमेदवार आर. वाय. घुटुकडे हे असून त्यांना या निवडणुकीत 935 मतं पडले आहेत. तर या निवडणुकीत आणखी दोन उमेदवारांची चर्चा होती ती म्हणजे अभिजित बिचकुले आणि करुणा मुंडे यांची. तर या निवडणुकीत करुणा मुंडे यांना 301 एवंढ मतदान झालं असून, अभिजित बिचकुले यांना 333 मतं पडली आहेत.

भाजपला मोठं यश 

दरम्यान आज पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल देखील लागले आहेत. भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर केरळमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.