Thane Water Supply: अन्यथा अर्धनग्न होऊन आंघोळ करू, आम आदमी पक्षाचा ठाणे महापालिकेला इशारा
esakal May 04, 2026 11:45 PM

ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. अशातच कळवा पूर्वेतील भास्करनगर, पौंडपाडा, पवनपाडा भागातही महिन्यात केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याने संतापलेल्या नागरिकांसह आम आदमी पक्षाने सोमवारी (ता. ४) पालिका मुख्यालयावर धडक दिली. या वेळी पाणीप्रश्न सोडवा अन्यथा अर्धनग्न होऊन अंघोळ करू, असा इशारा पालिका प्रशासनाला दिला.

यंदाच्या वर्षी तापमानात अपेक्षेप्रमाणे अधिक वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठ्यातदेखील कमालीची घट झाली आहे. त्यात पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात लागू करण्यात येते. त्यामुळे शहरात टंचाईची समस्या निर्माण होते. अद्याप कपात लागू करण्यात आली नसली तरी विविध कारणांमुळे पाणीपुरवठाबंद ठेवण्यात येत असल्याने टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

Mumbai News: भविष्याचा विचार करून भरपाई द्या! न्यायालयाचे ‘मॅक्ट’ला आदेश

अशातच कळवा पूर्वेतील भास्कर नगर, पौंड पाडा आणि पवनपाडा परिसरात महिन्यातून केवळ चार वेळा अवघ्या अर्ध्या तासासाठी पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करत, या भागातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून आम आदमी पक्षाने ठाणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

समस्या सोडविण्याचे आश्वासन

परिसरात तीन जलकुंभ असतानाही नियमित पाणी मिळत नसल्याने लाखो नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील नागरिक करदाते असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. विभागीय पाणीपुरवठा अधिकारी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पाडत नाही, असा आरोप आम आदमी पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अमर आमटे यांनी केला. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेत ती सोडविण्याचे आश्वासन दिले.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.