Narendra Modi | बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले….
Tv9 Marathi May 05, 2026 12:45 AM

पश्चिम बंगालसह देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निकालांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 200 पेक्षा अधिक जागांच्या जवळ पोहोचल्याचे चित्र आहे. या प्रचंड यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बंगालच्या जनतेसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो लोकांना होणार असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “बंगालच्या पावन भूमीवर नवीन सूर्योदय झाला आहे. ही अशी पहाट आहे ज्याची अनेक पिढ्यांनी वाट पाहिली होती. हा विजय केवळ आकडा नाही, तर हिंसा आणि भीतीच्या राजकारणाचा अंत आहे.” ते पुढे म्हणाले की, आजपासून बंगालच्या भविष्याची नवीन यात्रा सुरू होत आहे, जी विकास, अटळ विश्वास आणि नव्या आशेने पुढे जाईल. भाजप सरकार दिवसरात्र जनतेसाठी काम करेल, असा विश्वास त्यांनी दिला. मोदींनी घोषणा केली की, “पहिल्याच कॅबिनेटमध्ये आयुष्मान भारत योजना बंगालमध्ये लागू करण्यास मंजुरी दिली जाईल. तसेच घुसखोरांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
रवींद्रनाथ टागोर यांना नमन करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. तसेच बंगालमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करणे ही भाजपची गॅरंटी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे नमूद करत सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत एकाही निर्दोष नागरिकाचा मृत्यू झाला नाही, हे लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.