मुंबई पालिकेत 87 हजारापेक्षा अधिक जन्म - मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता, अमित साटमांचे आयुक्तांना पत्र, सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख
अभिषेक मुठाळ May 04, 2026 09:13 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 87 हजार पेक्षा अधिक जन्म आणि मृत्यू नोंदींमध्ये अनियमितता असल्याचं समोर आलं आहे. यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबन करण्याची आणि त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना साटम यांनी पत्र लिहलं आहे. बनावट नोंदण्यांचे प्रभागनिहाय वर्गीकरण करावे आणि सामील एमएचओंची ओळख पटवावी. या घोटाळ्यामुळे घुसखोरांनी पालिकेच्या प्रणालीमध्ये प्रवेश केल्याने शहराच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. 

मुंबई महापालिकेने प्रभागनिहाय बनावट नोंदण्यांचे वर्गीकरण सुनिश्चित करावे

अमित साटम यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेल्या पत्रात आमदार साटम यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी (एमएचओ) केलेल्या नोंदणीमधील गंभीर विसंगतींवर प्रकाश टाकला आहे. या नोंदी अनिवार्य नागरी नोंदणी प्रणाली ऐवजी (सीआरएस) सॅप पोर्टलवर करण्यात आल्या असून त्यांच्या सत्यतेची सध्या पडताळणी सुरू असल्याचे आमदार साटम यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. मुंबई महापालिकेने प्रभागनिहाय बनावट नोंदण्यांचे वर्गीकरण सुनिश्चित करावे आणि त्यात सामील असलेल्या एमएचओंची ओळख पटवावी. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेनुसार गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी आमदार साटम यांनी केली आहे.

शहराच्या सुरक्षिततेला मोठा धोका 

या कथित घोटाळ्यामुळं घुसखोरांना बनावट कागदपत्रे मिळवून महापालिकेच्या कामकाज प्रणालीमध्ये (सॉफ्टवेअर ) प्रवेश करणे शक्य झाले असावे. ज्यामुळे शहराच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार, 2024 ते 2026 या कालावधीत जन्म-मृत्यु नोंदीच्या एसएपी प्रणालीद्वारे 87000 हून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या असून सीआरएस पोर्टलवर केवळ 33772 नोंदी करण्यात आल्याप्रकरणावर आमदार साटम यांनी बोट ठेवले आहे.

अनेक प्रभागांमधील एमएचओंनी भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले

मुंबई महापालिकेच्या अनेक प्रभागांमधील एमएचओ यांनी भारताच्या रजिस्ट्रार जनरलने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. तसेच केवळ अनिवार्य सीआरएस पोर्टलवरच नव्हे तर मुंबई महापालिकेच्या अंतर्गत प्लॅटफॉर्म असलेल्या जुन्या सॅप-सीपीडब्ल्यूएम प्रणालीवर देखील ते दुरुस्त्या करत होते, ही गंभीर बाब तपासात समोर आल्याचा दावा आमदार अमीत साटम यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे.

Amit Satam : राजकारणासाठी मराठी, स्वतःच्या कुटुंबाकरिता इंग्रजी व इतर विदेशी भाषा? भाजपच्या अमित साटम यांचा सवाल, ठाकरेंचं नाव न घेता टीकास्त्र

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.