बोईसरमध्ये पाणीटंचाईचे संकट
सिमेंटच्या जंगलामुळे पुरवठ्यावर ताण
बोईसर, ता. ४ (वार्ताहर) : औद्योगिक व रहिवासी विस्तार झपाट्याने वाढत असलेल्या बोईसर परिसरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणातील नवीन बांधकामे आणि सिमेंटच्या जंगलात होत चाललेले रूपांतर यामुळे उपलब्ध पाणीपुरवठ्यावर प्रचंड ताण निर्माण झाला असून, नागरिकांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
दरवर्षी येथे जानेवारी अखेरपासूनच पाण्याची कमतरता जाणवू लागते आणि फेब्रुवारीपासून परिस्थिती अधिक बिकट बनते. अनेक गृहसंकुल, चाळी व वस्त्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे टँकरचालकांनाही पाण्याची उपलब्धता कमी पडत असून, वेळेवर पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी धावपळ सुरू आहे.
त्यामध्येच सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उष्णतेचा वाढता तडाखा आणि त्यातच निर्माण झालेली पाण्याची टंचाई यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत असून, पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. नागरिकांच्या मते, परिसरातील झपाट्याने वाढलेली बांधकामे, मोठ्या प्रमाणात झालेली झाडांची तोड आणि कमी होत चाललेला पाऊस हेही या गंभीर परिस्थितीमागील प्रमुख कारण ठरत आहेत. हिरवळ नष्ट होऊन परिसर सिमेंटच्या जंगलात बदलत चालल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्याचा थेट परिणाम पर्जन्यमानावर होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
-----------
वृक्षलागवडीवर भर देण्याची मागणी
पाण्यासाठी करावा लागणारा अतिरिक्त खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसून आर्थिक ताण अधिक वाढताना दिसत आहे. ‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या मूलभूत गरजांप्रमाणेच पाणीही जीवनासाठी अत्यावश्यक असताना, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच निर्माण झालेली ही गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीवर भर देण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.