जीवनदूतांचा होणार सन्मान
स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला जीव; रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ ः रायगड जिल्हा येथे वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणाऱ्या स्वयंसेवकांचा गौरव करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अपघाताच्या प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून जखमी प्रवाशांचे प्राण वाचवणारे तसेच त्यांना तातडीने उपचारासाठी मदत करणाऱ्या ‘जीवनदूतां’चा रायगड पोलिस विभागाकडून सन्मान करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हा वाहतूक शाखा, रायगड-अलिबाग यांच्या वतीने मंगळवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता पीएनपी नाट्यगृह येथे ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ आयोजित केला आहे. हा कार्यक्रम ‘रस्ता सुरक्षा अभियान-२०२६’ अंतर्गत राबवण्यात येत असून, अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणाऱ्या नागरिकांच्या कार्याची दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत घटनास्थळी प्रथम पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरते. अनेक वेळा या व्यक्तींच्या तत्परतेमुळे गंभीर जखमींचे प्राण वाचतात. त्यांच्या या मानवतावादी कार्याची दखल घेत पोलिस प्रशासनाकडून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी तसेच विविध संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या निमित्ताने रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती होण्यासही मदत होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी अशा मदतकार्यामध्ये सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.