Assam Election Result 2026 : पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळसोबत निवडणूक झालेली आणखी दोन राज्यं म्हणजे पद्दुचेरी आणि आसाम. आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या नेतृत्वावर जनतेनं तिसऱ्यांदा विश्वास टाकला अन् पुन्हा एकदा भाजपकडे सत्ता सोपवली. प्रचारादरम्यान झालेले वाद, आरोप-प्रत्यारोप याचा भाजपच्या मतांवर परिणाम झाला नाहीच, उलट त्यांना त्याचा फायदाच झाल्याचं चित्र आहे. शिवाय या निकालामुळे सरमा यांचं पक्षांतर्गत वजन आणखी वाढलं आहे.
आसाममध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचीच जादू चालली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत भाजपनं नवा इतिहास घडवला. यात प्रचारापासून ते निकालापर्यंत प्रत्येक टप्प्यावर केंद्रस्थानी राहिलेले हिमंता बिस्वा सरमा यांचंही पक्षातलं वजन यामुळे वाढणार आहे.
आसामच्या निवडणुका भाजपनं सरमा यांच्याच चेहऱ्यावर लढल्या. शिवाय रणनीतीकार आणि मुख्य प्रचारक या भूमिकाही त्यांनी समर्थपणे सांभाळल्या. राज्यभर झंझावाती दौरे करत त्यांनी शेकडो सभा घेतल्या. आक्रमक आणि थेट संवाद साधणारी त्यांची शैली आणि स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचा भाजपला फायदा झाला.
कोणत्याही राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवणं तितकंसं सोपं नसतं. त्याच पक्षाची तीच धोरणं आणि तेच चेहरे याला जनता कंटाळते आणि केवळ बदल घडवण्यासाठी मतदान होतं. मात्र सरमा यांच्या नेतृत्वात भाजपनं हा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोडीत काढला आहे.
आसाममध्ये प्रचारादरम्यान सर्वाधिक गाजला तो पवन खेरा यांनी केलेल्या आरोपांमुळे. सरमा यांच्या पत्नीच्या नावे तीन पासपोर्ट असल्याचा सनसनाटी आरोप खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला. सरमा आणि भाजपनं हाच मुद्दा बनवला आणि त्यावरून काँग्रेस महिलाविरोधी असल्याची हवा केली. आता विजयाची हॅट्रिक केल्यानंतर यावरून काँग्रेसला टोमणा लगावायला सरमा विसरले नाहीत.
आसाममध्ये प्रस्थापितविरोधी लाट निर्माण करण्यात काँग्रेसला सपशेल अपयश आल्याचं या निकालामुळे स्पष्ट झालं. उलट सरमा यांच्या पत्नीवर आरोप करून काँग्रेस नेत्यांनी भाजपलाच विनाकारण नवा मुद्दा दिला. राज्यात कोणताही चेहरा नसणं, संघटनात्मक रचनेचा आभाव आणि केंद्रीय नेतृत्वाचं दुर्लक्ष यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा नांगी टाकावी लागली आहे.
सलग तिसऱ्यांदा सत्ता म्हणजे केवळ विजय नाही, तर नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास असल्याचं प्रतीक असतं. निवडणुकीच्या अग्निपरीक्षेमुळे आता हिमंता बिस्वा सरमा मात्र अधिक उजळून निघालेत. केवळ आसाम नव्हे, तर संपूर्ण ईशान्य भारतात भाजपचा मुख्य चेहरा म्हणून त्यांना ओळख मिळाली आहे. आगामी काळात राष्ट्रीय राजकारणात सरमा यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या, तर ते स्वाभाविकच असेल.
ही बातमी वाचा: