Rahul Gandhi नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकीवरुन भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. आसाम आणि बंगाल ही भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर केलेली निवडणूक चोरीची स्पष्ट उदाहरणं असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत असून बंगालमध्ये 100 जागांची चोरी झाल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली होती. यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर आसाम आणि बंगालची निवडणूक चोरल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, आसाम आणि बंगाल ही भाजपनं निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यावर निवडणूक चोरी केल्याची स्पष्ट उदाहरणं आहेत. आम्ही ममता बॅनर्जी यांच्यासोबत सहमत आहोत. बंगालमध्ये 100 जागांची चोरी झाली.
आपण या प्रकारचा खेळ यापूर्वी मध्यप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि लोकसभा निवडणूक 2024 इत्यादीमध्ये पाहिल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. निवडणूक चोरी, संस्था चोरी, आता काय मार्ग राहिलाय, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
Assam and Bengal are clear cases of the election being stolen by the BJP with the support of the EC.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 4, 2026
We agree with Mamata ji. More than 100 seats were stolen in Bengal.
We have seen this playbook before:
Madhya Pradesh.
Haryana.
Maharashtra.
Lok Sabha 2024 etc
चुनाव चोरी,…
राहुल गांधी यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुक प्रमुख ए.के. स्टॅलिन यांच्यासोबत राहुल गांधी यांनी चर्चा केली. याशिवाय राहुल गांधी यांनी तामिळनाडूमध्ये विजय मिळवणाऱ्या टीव्हीके पक्षाचे नेते विजय यांच्यासोबत चर्चा केली.
केरळमध्ये काँग्रेसला दहा वर्षानंतर यश आलं आहे. केरळमध्ये काँग्रेसनं डाव्या पक्षांच्या एलडीएफचा पराभव केला. काँग्रेस प्रणित यूडीएफला 102 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर डाव्या पक्षांना 35 जागांवर आघाडी मिळाली होती.
आसाममध्ये भाजपनं सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसला आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये यश मिळवता आलेलं नाही. आता पश्चिम बंगाल आणि आसाममधील निकालानंतर विरोधी पक्षांकडून कोणती रणनीती राबवली जाणार या कडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.