Degree Admissions : पदवी प्रवेशासाठी चुरस; 'कट-ऑफ' घसरण्याची चिन्हे
esakal May 05, 2026 03:45 AM

पुणे - तुम्ही विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या मूलभूत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला सहज प्रवेश मिळेल. व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून देणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्यांमध्ये चुरस असेल. राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालात घट झाल्याने शहरातील महाविद्यालयांचा पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ घसरण्याची चिन्हे आहेत. मात्र, नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाच्या पहिल्या यादीचा ‘कट-ऑफ’ हा नव्वदीपार असणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालानंतर प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवेशादरम्यान नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाच्या पहिल्या यादीचा ‘कट-ऑफ’ हा साधारणपणे ९२ ते ९६ टक्के इतका असणार आहे.

नामांकित महाविद्यालयांत पहिल्या यादीत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण आवश्यक असतील. तर दुसऱ्या-तिसऱ्या यादीतही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी चढती असणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, विविध व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घेतलेल्या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील. त्यामुळे नामांकित महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील अनेक जागा तिसऱ्या-चौथ्या फेरीनंतर पुन्हा रिक्त होण्याची चिन्हे आहेत. या रिक्त जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना संधी मिळेल, असे निरीक्षण प्राचार्यांनी नोंदविले.

पदवी ‘कट-ऑफ’ वैशिष्ट्ये

  • गेल्यावर्षीच्या तुलनेत पहिल्या फेरीचा ‘कट-ऑफ’ काहीसा घसरण्याची शक्यता

  • नामांकित महाविद्यालयांतील पहिल्या फेरीच्या ‘कट-ऑफ’मध्ये फारसा बदल नसेल

  • विज्ञान शाखेचा ‘कट-ऑफ’ दुसऱ्या-तिसऱ्या फेरीनंतर घसरेल

  • नामांकित महाविद्यालयांतील कला शाखेचा ‘कट-ऑफ’ चढता राहील

  • वाणिज्य शाखेसाठीही चुरस असेल

शाखानिहाय प्रवेशाचा कल

शाखा कमी होत असलेला कल वाढणारा कल

विज्ञान -

मूलभूत बी.एस्सी

बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, एआय ॲण्ड एमएल, सायबर सिक्युरिटी, ब्लेंडेड बी.एस्सी

कला -

मूलभूत बी.ए

मानसशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरी सेवा, इतिहास, इंग्रजी, लिबरल आर्ट्स

वाणिज्य -

मूलभूत बी.कॉम

बी.कॉम (ऑर्नर), बीबीए-ह्यूमन रिसोर्स, मॅनेजमेंट सायन्स, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, बँकिंग ॲण्ड फायनान्स.

बारावीचा निकाल घसरल्याने पदवी प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ काहीसा घसरू शकतो; परंतु नामांकित महाविद्यालयांच्या ‘कट-ऑफ’वर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. फर्ग्युसन महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा ‘कट-ऑफ’ ९० ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान, तर कला शाखेतील नामांकित विषयांचा ‘कट-ऑफ’ ९५ ते ९८ टक्क्यांपर्यंतच राहून पुढच्या फेऱ्यांमध्ये तो केवळ १ ते १.५ टक्क्यांनी खाली येतो.

- डॉ. श्याम मुडे, प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

पदवी अभ्यासक्रमाच्या शाखांसाठी आणि शाखांअंतर्गत विषयांसाठी विविध मापदंड आहेत. मूलभूत विज्ञानातील काही विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची प्रवेशाची संख्या कमी आहे. बी.एस्सी डेटा सायन्स, एआय ॲण्ड एमएल, सायबर सिक्युरिटी अशा विषयांना विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. कला शाखेत मानसशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास या विषयांना कायमच विद्यार्थ्यांची गर्दी राहणार आहे. मोजक्याच नामांकित महाविद्यालयांत अनुभवी प्राध्यापक असल्याने या महाविद्यालयांचा ‘कट-ऑफ’ हा चढताच असेल.

- डॉ. अविनाश मोहरील, प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.