सोलापूर : येथील रविवार पेठ परिसरातील जोशी गल्लीतील बाळासाहेब पांडुरंग सरवदे या मनसे पदाधिकाऱ्याचा महापालिका निवडणुकीवेळी वादातून खून झाला होता. यातील संशयित आरोपी भाजप नगरसेविका शारदा तानाजी शिंदे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजवैद्य पी. पी. यांनी जामीन मंजूर केला आहे. तब्बल ११८ दिवसांनंतर त्यांना जामीन मिळाला आहे.
मृताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांच्या फिर्यादीनुसार खुनातील संशयित आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती. ‘अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली होती. त्यातून २ जानेवारी रोजी दुपारी एक ते सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ संशयित आरोपींनी वाद घातला. त्यानंतर त्यांनी भाऊ बाळासाहेब सरवदेच्या डोळ्यात चटणी टाकली, जेणेकरून त्याला काहीही दिसू नये. त्यानंतर काहींनी त्याचे हात पकडले, बाकीच्यांनी तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्याचा खून केला, असे फिर्यादीत नमूद होते. या प्रकरणी जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी १५ संशयित आरोपींना अटक केली होती. त्यापैकी नगरसेविका शारदा तानाजी शिंदे यांनी ॲड. संतोष न्हावकर यांच्यामार्फत जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
वकिलांचा ‘असा’ युक्तिवाद अन् न्यायालयाने दिला जामीन
सुनावणीवेळी ‘आरोपीने मृताच्या डोळ्यात चटणी टाकल्याचा आरोप आहे, परंतु फॉरेन्सिक टिमला तपासणीत चटणी मिळालेली नाही. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात देखील डोळ्यात चटणी दिसून येत नाही. बाकी नेत्रसाक्षीदार शारदा यांच्यावर काहीच आरोप करीत नाहीत. असे मुद्दे ॲड. न्हावकर यांनी न्यायालयात मांडले. त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शारदा शिंदे यांचा जामीन मंजूर केला. यात संशयित आरोपीतर्फे ॲड. न्हावकर, ॲड. राहुल रूपनर, ॲड. मीरा पाटील यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.