IPL 2026: रोहित शर्मा, रायन रिकल्टन यांना शतकाची हुलकावणी; पण मुंबई इंडियन्सने विजय मिळवून लखनौ सुपर जायंट्सलाही फेकले बाहेर
esakal May 05, 2026 03:45 AM

Rohit Sharma miss century MI vs LSG IPL 2026 match : रोहित शर्माने पुनरागमनाचा सामना गाजवताना लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. त्याने आणि रायन रिकल्टनने सलामीला ६५ चेंडूंत १४३ धावांची विक्रमी भागीदारी करून मुंबई इंडियन्सच्या विजयाचा पाया भक्कम केला. रोहित व रिकल्टन या दोघांचेही शतक थोडक्यात हुकले. पण, MI ने विजय मिळवून LSG लाही प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले. या दोन्ही संघांनी ९ सामन्यांत केवळ २ विजय मिळवले आहेत आणि उर्वरित पाच सामने जिंकून ते जास्तीतजास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतील. ही गुणसंख्या प्ले ऑफसाठी पुरेशी नाही.

मला दाखव, काय लिहिले आहेस? Raghu Sharma ने विकेट घेताच खिशातून पेपर काढला, सूर्यकुमार यादव वाचायला गेला; भावनिक संदेश...

निकोल पूरन व मिचेल मार्श यांच्या वादळी खेळीनंतर LSG सहज २५० पार धावसंख्या उभ्या करतील असे वाटले होते. पण, MI च्या गोलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत चांगले पुनरागन केले आणि लखौला ५ बाद २२८ धावांपर्यंत रोखले. पूरनने २१ चेंडूंत १ चौकार व ८ षटकारांसह ६३ धावांची वादळी खेळी केली. मार्शनेही २५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावांवर बाद झाला. या दोघांच्या विकेटनंतर लखनौच्या धावगतीला ब्रेक लागला होता.

फिरकीपटू रघु शर्माने मधल्या षटकांत चांगला मारा केला. एडन मार्करवने २५ चेंडूंत ३१ व हिंमत सिंगने ३१ चेंडूंत ४० धावांची नाबाद खेळी करून संघाला ५ बाद २२८ धावांपर्यंत पोहोचवले. LSGची ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली. २०२३ मध्ये त्यांनी पंजाबविरुद्ध ५ बाद २५७, २०२५ मध्ये कोलकाताविरुद्ध ३ बाद २३८ आणि २०२५ मध्ये गुजरातविरुद्ध २ बाद २२८ धावा केल्या होत्या. लखनौ आजच्या सामन्यात १६ षटकार खेचले, जी त्यांची डावातील संयुक्तपणे दुसरी सर्वोत्तम षटकारांची संख्या आहे.

पाच सामन्यानंतर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माला पाहून स्टेडियमवर एकच जल्लोष झाला. फॉर्मात असलेल्या रायन रिकल्टनने आक्रमक शैली कायम राखताना LSG च्या गोलंदाजांना चोप दिला. MI ने पाच षटकांत पन्नास धावा पूर्ण केल्या आणि पॉवर प्लेमध्ये ही धावसंख्या ७१ पर्यंत पोहोचली. रोहित व रिकल्टनची आतषबाजी स्टेडियम दणाणून सोडत होती. LSG विरुद्ध पॉवर प्लेमध्ये केल्या गेलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. रिकल्टनने २२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर रोहितनेही २७ चेंडूंत आयपीएलमधील ४९ वी फिफ्टी ठोकली. मुंबईने १० षटकांत १२७ धावा उभ्या केल्या.

MI vs LSG Live: मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवले? रोहित शर्मा परतला, सूर्यकुमार यादव टॉससाठी आला अन् म्हणाला...

११व्या षटकात मोहसिन खानने विकेटची संधी निर्माण केली होती, परंतु खेळाडू कॅचपर्यंत पोहोचू शकला नाही. रिषभ पंतची क्षेत्ररक्षणाची रणनीती आज फसलेली दिसली. पण, मोहसिनने त्याच षटकात रिकल्टनची विकेट मिळवली. ३२ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांसह ८३ धावांवर त्याला माघारी जावे लागले, त्याचे आणखी एक शतक हुकले. रोहितसह त्याची १४३ धावांची विक्रमी भागीदारी तुटली. रिकल्टनने तिसऱ्यांदा एका डावात ८ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत आणि किरॉन पोलार्डच्या विक्रमाशी बरोबरी केली.

रोहित आज शतकाचा दुष्काळही संपवेल असे वाटत असताना मनिमरण सिद्धार्थने त्याला बाद केले. रोहित ४४ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. रोहितचे शतक हुकल्याचे दुःख चाहत्यांना होते, परंतु त्याच्या आक्रमक फटकेबाजीचे साऱ्यांनी कौतुक केले. रोहित बाद झाला, तेव्हा मुंबईला ३६ चेंडूंत ५२ धावा हव्या होत्या, त्यात तिलक वर्माची ( ११) विकेट पडल्याने LSG ला पुनरागमनाचे स्वप्न पडू लागले होते. सूर्यकुमार यादवही ११ धावांवर बाद झाला. पण, नमन धीर ( २३ ) मुंबईला ६ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.