टाकळघाट - येथील सोनाबाई नगर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीने आर्थिक अडचणी आणि नैराश्याला कंटाळून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ५) सायंकाळी उघडकीस आली. मनीष देवराव मारबते (वय-२४) आणि प्रतीक्षा मनीष मारबते (वय-२१), रा. खेडीखुर्द, ता. नरखेड, हे दोघेही सध्या टाकळघाट येथे वास्तव्यास होते.
मनीष आणि प्रतीक्षा यांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर कामाच्या शोधात ते पुणे येथे गेले; मात्र अपेक्षित काम न मिळाल्याने ते दीड वर्षानंतर टाकळघाट येथे मनीषच्या भावाकडे आले. येथे ते शेख कनोजिया यांच्या घरात भाड्याने राहत होते. मनीषने एमआयडीसीतील एका कंपनीत काम सुरू केले होते, परंतु कामाच्या कठीण परिस्थितीमुळे तो पुन्हा कामावर गेला नव्हता. यामुळे आर्थिक ताण वाढला आणि दोघांमध्ये किरकोळ वाद होत होते.
दरम्यान, फिर्यादी गिरीश मारबते यांना पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खोलीत पाहिले असता दोघांनी एकाच दोरीला गळफास घेतल्याचे दिसून आले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.