IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण
esakal May 06, 2026 03:45 AM

Sanju Samson breaks Chris Gayle IPL record 2026 details: चेन्नई सुपर किंग्सने मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सवर ८ विकेट्स व १५ चेंडू राखून विजय मिळवला. CSK च्या गोलंदाजांनी DC ला कोंडीत पकडले होते, पंरतु त्रिस्तान स्तब्स व समीर रिझवी यांनी संघाला ७ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर संजू सॅमसन व कार्तिक शर्मा यांच्या मॅच विनिंग ११४ धावांच्या भागीदारीने संघाला सहज विजय मिळवून दिला. CSK चा हा मागील ७ सामन्यांतील पाचवा विजय ठरला आणि ज्या ज्या सामन्यात संजूने ४० पेक्षा अधिक धावा केल्या, तो सामना चेन्नईने जिंकला आहे.

निम्मा संघ ६९ धावांवर माघारी परतल्यानंतर स्तब्स ( ३८) ने समीरसह डाव सावरला. समीर २४ चेंडूंत ४० धावांवर नाबाद राहिला. चेन्नईकडून नूर अहमदने २ विकेट्स घेतल्या. अकिल होसैन, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग व जेमी ओव्हरटन यांनी प्रत्येकी १ बळी टिपला. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने ४५ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. ऋतुराज गायकवाड ( ६) व उर्विल पटेल ( १७) माघारी परतले.

संजू व कार्तिक ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि ११४ धावांची नाबाद भागीदारी केली. कार्तिकने ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची नाबाद खेळी केली, तर संजूने५२ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ८७ धावा केल्या. संजू व कार्तिक यांची ११४ धावांची भागीदारी दिल्लीविरुद्ध चेन्नईसाठी कोणत्याही विकेटसाठीची दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०२३ मध्ये ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांनी १४१ धावा जोडल्या होत्या. संजू व आयुष म्हात्रे यांच्या ११३ धावांचा विक्रम या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएल २०२६ मध्ये संजूने चेन्नईच्या विजयात खूप मोठा हातभार लावला आहे. चेन्नईने जिंकलेल्या पाच सामन्यांत संजूने १८१ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या, तर पाच पराभवात संजूला ४० धावा करता आल्या. संजूने आजच्या खेळीसह IPL 2026 Orange Cap च्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा लोकेश राहुल ४४५ धावांसह अव्वल आहे. त्यानंतर अभिषेक शर्मा ( ४४०) व हेनरिच क्लासन ( ४२५) हे सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी ( ४०४) हे आहेत.

आयपीएलच्या एका पर्वात साखळी फेरीत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात संजूने आज ख्रिस गेलला मागे टाकले. संजूने आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद ११५ व नाबाद ८७ अशा एकूण २०२ धावा केल्या. ख्रिस गेलने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध नाबाद १७५ व २१ अशा १९६ धावा केल्या होत्या. या विक्रमात विराट कोहली २०९ ( १०० व १०९ वि. गुजरात लायन्स, २०१६) आणि लोकेश राहुल २०६ ( १०३ व १०३ वि. मुंबई इंडियन्स, २०२२) हे पुढे आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.