पुणे - पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर पडत, करिअरला गती देण्याच्या दृष्टीने एकाच वेळी दोन क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा दुहेरी पदवी अभ्यासक्रमाच्या दिशेने वाढत आहे. सध्या आठ ते दहा टक्के विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडत आहेत. असे असले तरीही दरवर्षी दुहेरी अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने एकावेळी दोन पदवी, पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय २०२२ मध्ये जाहीर केला. त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली. त्यामध्ये वेळोवेळी काही बदलही केले. त्यानुसार आयोगाने २०२५ मध्ये लागू केलेल्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांना दोन पूर्ण वेळ शैक्षणिक अभ्यासक्रम प्रत्यक्ष उपस्थित राहून करता येणार आहेत. फक्त असे अभ्यासक्रम करताना, त्यांच्या वेळा वेगवेगळ्या असणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्यांने एका पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यास आणि त्या अभ्यासक्रमाचे वर्ग सकाळच्या सत्रात भरत असल्यास, दुहेरी पदवीतील दुसऱ्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग हे दुपारच्या सत्रात असणे आवश्यक आहे. आयोगाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने अनेक विद्यार्थी गेल्यावर्षापासून दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत.
सध्या दुहेरी पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असली, तरी ती वाढत असून आगामी काळातही वाढणार आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासह पारंपारिक अभ्यासक्रम, पारंपारिक अभ्यासक्रमासह त्यातील प्रोफेशनल अभ्यासक्रम राबविण्याकडे महाविद्यालयांचा कल आहे. एवढेच नव्हे, तर विद्यार्थी एकावेळी दोन वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमधून पदवी घेण्याला पसंती देत असल्याचे दिसून येते.
महाविद्यालयांचा वाढता कल
एखाद्या सर्वसाधारण, मूलभूत पदवी अभ्यासक्रमासोबत जोडीला उपयुक्त पदवी अभ्यासक्रम पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे, महाविद्यालये स्वत:च दुहेरी पदवी अभ्यासक्रम नव्याने आणत आहेत. जेणेकरून, एखाद्या विद्यार्थ्यांने बी.ए किंवा बी.कॉमला प्रवेश घेतला, तर त्याला त्याच महाविद्यालयात बी.एस्सी इन सायबर सिक्युरिटी, बी.एस्सी इन सिव्हिल सर्व्हिसेस अशा स्वरूपाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. याशिवाय ‘सीओईपी’मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे दोन विद्यार्थी स. प. महाविद्यालयात बी.एस्सी इन सिव्हिल सर्व्हिसेस करत असल्याचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी सांगितले.
दुहेरी अभ्यासक्रम का?
एकावेळी दोन वेगवेगळ्या विषयांमधील ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्यांची कौशल्ये अधिक व्यापक होतात
एका क्षेत्रात मर्यादित न राहता विविध क्षेत्रांत नोकरी/व्यवसायाच्या संधी उपलब्ध
बहुविद्याशाखीय शिक्षणामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या तुलनेत वेगळेपण उमटते
स्वतंत्रपणे दोन वेगळ्या पदव्या घेण्यापेक्षा एकावेळी दोन पदव्या घेतल्याने वेळेची होते बचत
बदलत्या बाजारपेठेत कंपन्यांना बहुप्राविण्य असणारे उमेदवार हवेत
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याची मोकळीक मिळते
आकलनशक्ती, समज, क्षमता, कौशल्य वाढते
अभ्यासक्रम निवडताना हे करा
दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाची वेळ वेगवेगळी असेल, हे पाहून निवडा
एकाच किंवा वेगवेगळ्या महाविद्यालयांतील अभ्यासक्रम असल्यास हरकत नाही
दोन्ही अभ्यासक्रमातील प्रॅक्टिकल, प्रकल्प बुडणार नाहीत, असे हमीपत्र त्या-त्या महाविद्यालयाला द्यावे
‘ॲकॅडमिक बॅंक ऑफ क्रेडिट’साठी आवश्यक ती माहिती संबंधित पोर्टलवर अपडेट करा