करिअर वेध : तंदुरुस्तीसाठी करा व्यायाम
esakal May 06, 2026 07:45 AM

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

आयुष्यात तुम्ही तब्येत चांगली ठेवली, फिटनेस चांगला ठेवला, योग्य व्यायाम केल्यास वेगवेगळ्या क्षेत्रांत यश मिळू शकेल. तरच तुम्ही आयुष्याचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकता. तुम्ही कॉर्पोरेट, वैद्यकीय, वकिली किंवा शिक्षण क्षेत्रात काम करत असाल, स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही खेळाडू असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तरी त्या क्षेत्राचा अभ्यास, अनुभव, नवनवीन गोष्टी शिकणे व अपडेटेड असण्याबरोबर स्वतःची तंदुरुस्ती आवश्यक आहे. पूर्ण तंदुरुस्त असलेला माणूस हा त्याच्या इतर स्पर्धकांपेक्षा कमीत कमी २५ ते ३० टक्के अधिक क्षमतेने कार्य करतो. तो आनंदीही असतो. तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणं महत्त्वाचे आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्यास मानसिकदृष्ट्या कणखर राहू शकता. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे.

कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुमची तब्येत आणि ‘एनर्जी लेव्हल’ चांगली असणे या गोष्टीला फार महत्त्व आहे. कायम तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यासाठी महत्त्वाची गोष्ट प्रत्येकाला करावी लागते, ती म्हणजे योग्य व्यायाम. नियमित व्यायाम न केल्यास तुम्ही सुदृढ राहू शकत नाही. व्यायामाला कोणताही पर्याय अथवा ‘शॉर्टकट’ नक्कीच नाही. प्रत्येक माणसाची व्यायामाची पद्धत वेगळी असू शकते. उदा. जिम करणे, योगासने, चालणे, वजन उचलणे, सायकलिंग, आदी. आपापल्या प्रकृतीनुसार व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. खेळाच्या बाबतीत विचार केल्यास तंदुरुस्ती आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात तुमची तंदुरुस्ती आणि ‘एनर्जी लेव्हल’ यावर तुमचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. तुम्ही कोणत्याही खेळात करिअर करत असाल, तर त्या खेळासाठी लागणारा योग्य फिटनेस आणि व्यायाम ही त्या खेळाची पहिली गरज आहे.

क्रिकेटसारख्या खेळात पाच दहा वर्षांत फिटनेस आणि त्याच्याच अनुषंगाने करावा लागणारा व्यायाम या दोन्हीही प्रकारात विलक्षण प्रगती झालेली आहे. इतर खेळांप्रमाणेच कधीही पूर्वी नव्हतं एवढं अनन्यसाधारण महत्त्व क्रिकेटमधील तंदुरुस्तीला आलेलं आहे. ‘टी-२०’सारखा फॉरमॅट असेल किंवा वनडे गेम असेल, तिथे तंदुरुस्ती महत्त्वाची ठरते. भारतीय संघातील सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, सुरेश रैना, युवराज सिंग यांनी तंदुरुस्ती हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला आहे. विराट कोहलीने तंदुरुस्ती इतक्या उच्च स्तरावर नेऊन ठेवली आहे की, त्याच्याकडे क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीचा आयकॉन म्हणून जग बघते आहे.

आयुष्यात प्रत्येक माणूस यशस्वी होईलच असे नक्कीच नाही. खेळ असो वा व्यावसायिक करिअर, आपण तंदुरुस्ती आणि व्यायाम यामध्ये सातत्य दाखवले, तर आपल्याला उत्तम, निरोगी आयुष्य जगता येईल व पर्यायाने आपण आनंद, समाधान नक्कीच अनुभवू. आनंदी आयुष्य जगणे व कायम सकारात्मक राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.