शिक्षण चिंतन : कौशल्याधारित व्यावसायिक शिक्षण
esakal May 06, 2026 07:45 AM

डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानप्रधान आणि स्पर्धात्मक जगात शिक्षणाची भूमिका मोठ्या प्रमाणात बदलली आहे. केवळ सैद्धान्तिक ज्ञान देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट राहिलेले नाही, तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये विकसित करणे ही गरज बनली आहे. नवीन अभ्यासक्रमांमध्ये शिक्षणाला ‘प्रत्यक्ष कामाशी जोडणे’ ही मूलभूत कल्पना आहे. हे शिक्षण स्थानिक गरजा, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक परिस्थिती यांच्याशी जोडलेले अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण घेऊन थांबायचे नाही, तर त्याचा उपयोग जीवनात कसा करायचा आणि आर्थिक उत्पन्न कसे मिळवायचे हेही शिकायचे आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधाराने विकसित करण्यात आलेली ‘कौशल्य बोध’ ही इयत्ता सहावी ते नववीसाठीची व्यावसायिक शिक्षणाची पुस्तके या बदलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक तीन प्रकारच्या कामांची ओळख करून देण्यात आली आहे.

ती म्हणजे -

१) जीवांसंबंधित काम : या पहिल्या प्रकारामध्ये जिवंत प्राणी अथवा वनस्पती यांच्याबरोबर काम करणे अपेक्षित आहे. जसे पशुपालन, मधमाशिपालन, कुक्कुटपालन किंवा परसबाग, रोपवाटिका, शेती, मातीविना शेती इत्यादी जीवां-संबंधित कामामध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्याबरोबर काम करताना विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण कौशल्य विकसित होते, तसेच पर्यावरणाविषयी संवेदनशीलता वाढते. पाणी, अन्न व अन्य संसाधनांचे नियोजन करण्याची सवय लागते. समस्या सोडविण्याची क्षमता वाढते. सजीवांची काळजी घेताना विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते, तसेच संयम व चिकाटी यासारखे गुण विकसित होतात.

२) यंत्रे व सामग्री : यामध्ये यंत्रांचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांवर काम करणे अपेक्षित आहे. यात अगदी स्क्रू-ड्रायव्हर, करवत, कुदळ-फावड्यापासून ते उपलब्धतेनुसार लेथ यंत्र, शिलाई यंत्र, सीएनसी यंत्रे, थ्रीडी प्रिंटर इथपर्यंतच्या यंत्राचा समावेश होतो. या प्रकारचे काम करताना विद्यार्थ्यांना विविध साधने आणि यंत्रांचा वापर करण्याची तांत्रिक कौशल्ये प्राप्त होतात. वस्तू तयार करताना त्यांचे हस्तकौशल्य वाढीस लागते आणि अचूकतेने काम करण्याची सवय लागते. यामध्ये मापन, रेखाचित्रे आणि आराखडा (डिझाइन) यामुळे गणितीय व सर्जनशील कौशल्ये विकसित होतात. तसेच नवीन कल्पना राबविण्याची क्षमता वाढते, सुरक्षिततेचे नियम पाळण्याची सवय लागते आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करण्याचे भान निर्माण होते.

३) मानवी सेवा : यात इतर माणसांशी संवाद व संबंध प्रस्थापित करण्याचे कौशल्य आत्मसात करून त्यांच्याकडून काम करून घेणे अथवा सेवा देणे अपेक्षित आहे. यात आरोग्य सेवा, पर्यटन, स्वागतिका, निवेदिका आदि व्यवसायांचा समावेश होतो. मानवी सेवांशी संबंधित कामामध्ये इतरांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य प्रभावी होते आणि सहानुभूतीची भावना विकसित होते. विविध परिस्थितींमध्ये काम करताना संघभावना आणि नेतृत्वगुण वाढते, तसेच निर्णय घेण्याची व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते. ग्राहकांशी व्यवहार करताना सेवा देण्याची वृत्ती आणि व्यावसायिकता अंगिकारली जाते. यामुळे वेळेचे व्यवस्थापन, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होते.

या शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विशिष्ट रचनेमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांचा अनुभव मिळतो आणि त्यांच्या आवडी-निवडी ओळखण्यास मदतही होते. शाळेच्या पातळीवरच विविध व्यवसायांची ओळख करून दिल्याने विद्यार्थी पुढील शिक्षण किंवा करिअर निवडताना अधिक सजग होतात.

व्यावसायिक शिक्षणात केवळ तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर कामाविषयी आदर, शिस्त, चिकाटी, सहकार्य, सर्जनशीलता आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांचाही विकास केला जातो. ‘कामाची प्रतिष्ठा’ ही भावना त्यांच्या मनात रुजते, जी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

एकंदरीत, व्यावसायिक शिक्षण ही केवळ एक शैक्षणिक पद्धत नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घालणारी एक प्रभावी दिशा आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.