डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
आपण सर्वच कधी ना कधी आजारी पडतो किंवा कधी कधी गंभीर आजारी पडू की काय अशी भीती वाटते. डॉक्टरांशी बोललो, त्यांनी समजावलं की ही भीती नाहीशी होते. परंतु काही व्यक्तींच्या बाबतीत ही भीती किंवा अनाठायी काळजी समस्या बनते. या अवाजवी काळजीने त्यांचं दैनंदिन जीवनही अस्वस्थ होतं. सर्वांनी परोपरीने समजावून सांगूनही आपल्याला काही तरी भयंकर, गंभीर दुखणं झालंय आणि त्याचं डॉक्टरांना नीट निदान होत नाहीये ही (गैर) समजूत त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली असते.
अनेक डॉक्टर, अनेक चाचण्या झाल्या तरी त्यांचं समाधान होत नाही. कधी पोटात दुखलं तरी त्यांना कर्करोग झाला का, असं वाटू लागतं. मुळात दुखणं मनाशी संबंधित असतं. या अस्वस्थतेच्या आजाराला ‘डीएसएम’ (डायनॉस्टिक स्टॅटेस्टिकल मॅन्युअल)नुसार ‘हायपोकॉन्ड्रिया’ किंवा ‘इलनेस इन्झायटी डिसऑर्डर’ म्हणतात. या आजारात कधी कधी कुठलंच शारीरिक लक्षण वास्तवात नसू शकतं किंवा सामान्य शारीरिक संवेदना ह्या व्यक्तीला गंभीर आजारपणाची लक्षणं वाटू शकतात.
अगदी पोटात होणारी लहानसहान हालचाल, आरशात सहज बघताना चेहऱ्यावर दिसलेली किरकोळ रॅश, शरीरावर कुठेतरी हाताला जाणवलेली, दिसलेली छोटीशी गाठ किंवा तोंडात उष्णतेमुळे आलेला अल्सर, फोड इत्यादीही अतिशय गंभीर आजाराची लक्षणे वाटू लागतात. तज्ज्ञांनी तपासणी करून काहीही नसल्याचा निर्वाळा दिला, तरी या व्यक्तींची समजूत पटत नाही. मुख्य म्हणजे हे चक्र एका आजाराच्या लक्षणांच्या शक्यतेची भीती वाटून गेल्यावर दुसऱ्या आजाराच्या लक्षणांची शक्यता, या पद्धतीने सुरूच राहते आणि व्यक्ती सातत्याने काळजी, भीतीच्या दडपणाखाली वावरत राहते.
त्रास
अशा व्यक्ती स्वत: त्रस्त असतातच; त्याचबरोबर जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांनाही त्रास होतोय याचं तारतम्य ते गमावून बसतात. अशात नाती तुटण्याचा धोकाही उद्भवू शकतो. त्रास खूप वाढल्यास ती व्यक्ती नैराश्येत जाऊ शकते. अशा वेळी स्वस्थता मिळवण्यासाठी व्यसनांचा मार्ग काही व्यक्ती अवलंबतात.
कारणे
अनुवांशिकता, मेंदूतील रासायनिक असंतुलन, लहानपणापासून व्यक्तिमत्त्वामधील दोष, जवळच्या नातेवाइकाचा किंवा व्यक्तीचा गंभीर आजारामुळे झालेला मृत्यू, त्याचं आजारपणामुळे अंथरूणात खितपत पडणं अन् त्यामुळे बसलेला धक्का अशी एक किंवा एकत्रित अनेक कारणे यामागे असतात.
लक्षणे
आपल्याला अतिशय गंभीर आजार झाला आहे किंवा होणार आहे याची काळजी.
किरकोळ लक्षणे किंवा शरीरातील नैसर्गिक संवेदनांना गंभीर आजाराची पूर्वसूचना समजणे.
टेस्ट रिपोर्ट्स नॉर्मल आले आहेत याची डॉक्टरकडून वारंवार खात्री करून घेणे. वारंवार डॉक्टर बदलणे आणि तपासण्या करत राहणे.
इंटरनेटवर रोग व निदान याविषयीच्या साइट्स पहात रहाणे. विविध साइट्सवर सांगितलेली आजाराची लक्षणे आपल्याला लागू होतात का, हे ताडून पाहणे.
आपल्या कुटुंबीयांत सध्या किंवा पूर्वीच्या पिढ्यांत असलेला कुठलाही आजार आपल्याला होईल ही भीती बाळगणे.
आपल्याला जाणवणाऱ्या लक्षणांविषयी सतत बोलत राहणे.
आपल्याला आजार होईल या भीतीने गर्दीच्या, सभा संमेलनांच्या, समारंभाच्या ठिकाणी जाणे टाळणे.
उपाय
काही औषधांबरोबर मानसोपचार आवश्यक ठरतात.
समुपदेशनाबरोबर तणाव नियोजनाची, स्वस्थतेची तंत्रे, तसेच ‘सीबीटी’ उपयोगी ठरते. ‘सीबीटी’मध्ये -
आपल्याला गंभीर आजार असण्याच्या शक्यतेच्या भीतीची आणि गैरसमजाची कारणं शोधली जातात.
स्वतःच्या शारीरिक संवेदनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं जातं. सदोष विचारपद्धतीमध्ये सुधारणा केली जाते.
आपल्या अनाठायी काळजीचा दुष्परिणाम आपलीच तब्येत बिघडण्यात आणि कुटुंबीयांचे मानसिक-शारीरिक स्वास्थ्यावर कसा होतो आहे, याची जाणीव करून दिली जाते.
ताणतणाव व चिंता यांना तोंड कसं द्यायचं, याचं मेंदूला प्रशिक्षण दिलं जातं.
गर्दी, समारंभ टाळण्याची विनाकारण निर्माण झालेली प्रवृत्ती नाहीशी करण्याबरोबरच टप्प्याटप्प्यानं भीतीला तोंड देण्यास शिकवलं जातं.