Veteran Marathi Poet Lyricist Madhav Pawar Passes Away: सोलापुरातील (Solapur News) ज्येष्ठ कवी, गीतकार तथा साहित्यिक माधव रामचंद्र पवार (Madhav Pawar) यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून साहित्यिक माधव पवार आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या 12-13 वर्षांपासून कवी माधव पवार किडनीच्या आजारानं त्रस्त होते. या काळात त्यांनी तब्बल 1 हजार 650 डायलिसिस पूर्ण करून मृत्युशी कडवी झुंज दिलेली. पण, अखेर प्रकृती अस्वास्थामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ज्येष्ठ कवी, गीतकार तथा साहित्यिक माधव रामचंद्र पवार यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
माधव पवार यांनी सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात 35 वर्षे वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावली. 'हे शुभशकुनांचे पक्षी' आणि 'गरूडभरारी' हे त्यांचे काव्यसंग्रह सर्वसामान्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. 21 राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. तसेच, 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागत गीत लिहिण्याचा बहुमानही त्यांना मिळाला होता.
त्यांच्या गीतांना सुरेश वाडकर, आनंद शिंदे, आदर्श शिंदे यांसारख्या नामवंत गायकांनी स्वर दिले होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सोलापुरातील साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. माधव पवार यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंड असा मोठा परिवार आहे.
माधव पवार यांचं कवितेवरचं प्रेम आणि त्यांच्या कवितेतला साधेपणा वाचकांना आवडायचा. एकदा समरसता साहित्य परिषदेत बोलताना माधव पवार म्हणालेले की, "माझ्या कविता सामान्य जनतेसाठी असतात. माझे वडील म्हणायचे की, कविता ही साधी, सोपी असावी, ऐकणाऱ्याला ती लगेच समजावी. त्या दृष्टिकोनातून मी कविता करतो... खरं तर सोपी कविता लिहिणं हेच सगळ्यात अवघड असतं..."