बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि दिवंगत दिग्गज अभिनेता इरफान खानची एक चित्रपटप्रेमींना भावूक करणारी गोष्ट सध्या चर्चेत आली आहे. तब्बल 26 वर्षांपूर्वी तयार झालेला एक चित्रपट अनेक अडचणींमुळे प्रदर्शित होऊ शकला नव्हता. मात्र, आता अनेक वर्षांनंतर हा चित्रपट यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
अलीकडेच डिजिटल माध्यमांवर घडलेल्या अशाच एका घटनेने चित्रपटप्रेमींना भावूक केलं आहे. एक विस्मरणात गेलेला चित्रपट पुन्हा समोर आला आणि त्याने भारतीय सिनेमातील एक हरवलेला अध्याय जणू जिवंत केला.
इरफान खानच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळालं. ‘The Last Tenant’ या नावाचा चित्रपट शांतपणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आणि लगेचच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. हा केवळ एक चित्रपट नाही तर इरफानच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अभिनयाचा एक मौल्यवान नमुना आहे. त्याच्या डोळ्यांतील भाव, संवादफेक आणि सहज अभिनय पुन्हा एकदा पाहताना अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
26 वर्षांपूर्वीचा चित्रपट
या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे, हा इरफान खान आणि विद्या बालनचा एकमेव ऑन-स्क्रीन कोलॅबोरेशन आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट विद्या बालनच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या टप्प्यातील मानला जातो. जवळपास 26 वर्षांपूर्वी शूट झालेल्या या चित्रपटात विद्याची ताजी, नैसर्गिक अभिनयशैली आणि इरफानची गंभीरता स्पष्टपणे जाणवते. जी पुढे त्याच्या ओळखीचा भाग बनली.
या चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलताना विद्या बालन भावूक झाली. तिने सांगितलं की, इरफान खानसोबत काम करणं तेव्हाही खास होतं आणि आज त्याच्या स्मरणार्थ हा चित्रपट प्रदर्शित होणं आणखीच भावनिक आहे.
का प्रदर्शित झाला नव्हता चित्रपट?
मात्र, इतकी दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट इतकी वर्षं का प्रदर्शित झाला नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर दिग्दर्शक सार्थक दासगुप्ता यांच्या संघर्षात दडलेलं आहे. तिने सांगितलं की, चित्रपटाचं मूळ फुटेज हरवल्यामुळे हा प्रकल्प थांबला. त्यांनी आशाही सोडून दिली होती. पण अलीकडेच त्यांना या चित्रपटाची जुनी VHS टेप सापडली. त्या टेपचं पुनरुज्जीवन करून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यात आला.
‘द लास्ट टेनेंट’ हा चित्रपट The Salt Inc या बॅनरअंतर्गत प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून इरफान खान याच्यावरील प्रेक्षकांचं प्रेम आजही तितकंच जिवंत असल्याचं स्पष्ट होतं.