1970 ते 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एका अभिनेत्रीचं अक्षरश साम्राज्य होतं. ती म्हणजे ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी. त्यांच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि स्टारडमने त्या काळात प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती.
एवढंच नाही तर निर्माते तिच्या डेटसाठी महिनोनमहिने वाट पाहत असत आणि मोठमोठे सुपरस्टार तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असत. त्या काळात अभिनेत्रींसाठी मोठ्या मानधनाची कल्पनाही क्वचितच केली जात होती.
पण हेमा मालिनी यांनी ही परंपरा मोडत 1978 साली दिल्लगी या चित्रपटासाठी तब्बल 5 लाख रुपयांचे मानधन घेतले. त्या काळात ही रक्कम अत्यंत मोठी मानली जात होती आणि त्यामुळे त्या हिंदी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या.
हेमा मालिनी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यामध्ये सीता और गीता, ड्रीम गर्ल, राजा रानी, अली बाबा 40 चोर आणि शोले यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. रोमँटिक असो वा अॅक्शन प्रत्येक प्रकारच्या भूमिकांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी त्या काळात प्रचंड गाजली. दोघांनी मिळून जवळपास 35 चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी सुमारे 20 चित्रपट सुपरहिट ठरले. इतकंच नाही तर धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोबत काम करण्यासाठी लहान भूमिकांनाही होकार दिल्याच्या चर्चाही त्या काळात रंगल्या होत्या.