Met Gala 2026 या फॅशनच्या सर्वात मोठ्या मंचावर यंदा ईशा अंबानी हिने आपल्या कलात्मक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय परंपरा, शिल्पकला आणि आधुनिक कुट्योर यांचा अप्रतिम संगम तिच्या वेशभूषेत पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, आई निता अंबानीच्या दागिन्यांचा वापर, निजामकालीन सरपेच आणि 150 तासांत तयार झालेला खास गजरा यांसारख्या घटकांनी तिचा लूक अधिकच उठावदार बनवला.
ईशाने परिधान केलेली साडी प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ता यांनी खास तयार केली होती. ही साडी खऱ्या सोन्याच्या धाग्यांनी विणलेली असून, ती तयार करण्यासाठी 50 कारागिरांनी 1200 तासांहून अधिक मेहनत घेतली. साडीवर पिछवाई पेंटिंगपासून प्रेरित डिझाइन्स, हँड-पेंटिंग आणि नाजूक भरतकाम यांचा वापर करून भारतीय वस्त्रपरंपरेची झलक दाखवण्यात आली.
याशिवाय, ईशाच्या हातात दिसलेला ‘आंबा’ देखील चर्चेचा विषय ठरला. हा खरा आंबा नसून, प्रसिद्ध कलाकार सुबोध गुप्ता यांनी तयार केलेले एक आर्ट स्कल्प्चर होते. या छोट्याशा पण अनोख्या घटकाने तिच्या लूकमध्ये भारतीय वारसा आणि आधुनिक कलेचा संगम अधोरेखित केला.
ज्वेलरीच्या बाबतीतही ईशाने कोणतीही तडजोड केली नाही. तिने आईच्या वैयक्तिक संग्रहातील दागिने परिधान केले होते, ज्यात 250 कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे डायमंड नेकलेस, आकर्षक इअररिंग्स आणि हिऱ्यांच्या अंगठ्या यांचा समावेश होता. संपूर्ण लूकमुळे ती एखाद्या शाही राजकुमारीप्रमाणे दिसत होती.