Bengaluru, Chinnaswamy Stadium: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची चुरस वाढली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ टॉप 4 मध्ये असून शर्यतीत आहे. असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार होता. गतविजेत्या आरसीबी संघाचं होमग्राउंड असल्याने या ठिकाणी आयोजन केल्याचं बोललं जात होतं. पण आता या सामन्याचं ठिकाण बदलणअयात आलं आहे. आता आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगली आहे. हा सामना आधी बंगळुरूत होणार होता, तर मग बीसीसीआयने स्पर्धेच्या मध्यात ठिकाण का बदललं? अखेर सामन्याचं ठिकाण बदलण्याचं कारण काय? चला जाणून घेऊयात..
आयपीएल 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीचं ठिकाण बदलण्याचं कारण म्हणजे तेथे रंगलेलं आमदार प्रकरण… यापूर्वीच हा वाद निस्तरला गेला नाही तर बीसीसीआय वेगळ्या ठिकाणी अंतिम फेरीचं आयोजन करेल अशी चर्चा होती. झालंही तसंच.. आमदार प्रकरण काही सुटताना दिसत नसल्याने बीसीसीआयने अंतिम सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेच्या ओपनिंग सामन्यापूर्वी काँग्रेसचे आमदार विजयानंद कशप्पनवर यांनी एक प्रस्ताव ठेवला होता. प्रत्येक आमदाराला किमान पाच तिकीटं मिळायला हवीत. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो आणि त्याला रांगेत उभं राहून वाट पाहावी लागू नये. काँग्रेस आमदाराच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आरसीबी सामन्यासाठी पाच ऐवजी तीन तिकिटांची मागणी प्रत्येक आमदार आणि खासदारासाठी केली होती.
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या वक्तव्यानंतर या वादाला फोडणी मिळाली. इतकंच काय तर तिकीटांचा गैरवापर होईल असे आरोप लावले गेले. पण कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी तिकीटं ऑनलाईन विकत घेतली जातात, त्यामुळे विकत घेतात त्यांचा सहभाग असतो. तिकीट दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येत नाही. त्यामुळे आमदार किंवा त्यांचे कुटुंबीयच त्यांचा वापर करू शकतात. इतरांना त्यांचा वापर करता येणार नाही, असं सांगितलं. अखेर हा वाद टोकाला जात असल्याचं पाहून बीसीसीआयने लागलीच पावलं उचलली. बीसीसीआयने बंगळुरूतील सामना दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला. या शिवाय दुसरा पर्याय नसल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.