मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला अधिकृत मान्यता देण्यात आली असून यासाठी सुमारे 3.30 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील आणि परदेशातील नामांकित संशोधन संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये इस्रो आणि अमेरिकेतील नासा केंद्राचा समावेश आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हा आहे. संशोधन आणि नवोपक्रम यांना प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवण्यावर सरकारचा भर आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना मिळावी, हा यामागचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या 2148 विद्यार्थ्यांना जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या 180 विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरलेल्या 51 विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देण्याची विशेष संधी देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रगत संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळेल. यामुळे भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधक घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
ही बातमी वाचा: