मोठी बातमी समोर येत आहे, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार सुरूच आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदु अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. चंद्रनाथ रथ असं सुवेंदु अधिकारी यांच्या या पीएचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रनाथ रथ यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडण्यात आले, त्यापैकी तीन गोळ्या त्यांच्या छातीमध्ये घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. कार चालवत असलेल्या त्यांच्या ड्रायव्हरला देखील गोळी लागली असून, या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना पश्चिम बंगालच्या मध्यमग्राममध्ये घडली आहे. हल्लेखोराने पॉइंट ब्लँक रेंजवरून सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर गोळीबार केला. या घटनेत चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू झाला आहे. चंद्रनाथ रथ यांची गाडी आधी अडवण्यात आली, त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. चंद्रनाथ हे सुवेंदु अधिकारी यांचे निकटवर्तीय होते, गेल्या पाच वर्षांपासून ते सुवेंदु अधिकारी यांच्यासोबत ते होते. चंद्रनाथ हे मुळचे चंदितालाचे रहिवासी होते, सध्या ते मध्यग्राममध्ये राहत होते.
दरम्यान चंद्रनाथ यांच्या ज्या कारवर हल्ला करण्यात आला, त्या कारचं एक छायाचित्र देखील समोर आलं आहे. ज्यामध्ये गोळ्यांमुळे कारची काच तुटल्याचं स्पष्ट दिसत आहे. हल्लेखोर बाईकवरून आले आणि त्यांनी चंद्रनाथ यांच्यावर हल्ला केला. ज्या बाईकवरून हल्लेखोर आले होते, त्या बाईकला नंबर प्लेट देखील नव्हती, अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर भाजपने तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यामागे तृणमूलाच हात असल्याचं भाजपने म्हटलं आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. हत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.