Prakash Ambedkar on TVK Vijay: तमिळनाडूमध्ये विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. थलापती विजय यांचा 'टीव्हीके' (TVK) हा तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष असल्याने, राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले,"टीव्हीकेकडे बहुमत नाही" अशी शंका घेऊन राज्यपाल त्यांना निमंत्रण देण्यापासून रोखू शकत नाहीत. कलम 164 (2) नुसार, विजय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला विधानसभा सभागृहात त्यांचे बहुमत सिद्ध करावे लागेल. यासाठी त्यांनी दोन उदाहरणे (Precedents) दिली.
त्यांनी म्हटलं आहे की, 1989 च्या निवडणुकीत काँग्रेस 194 जागांसह सर्वात मोठा पक्ष होता. राष्ट्रपतींनी आधी राजीव गांधींना निमंत्रण दिले, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आणि त्यांनी 2 डिसेंबर 1989 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
1996 च्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, पण त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हते. तरीही राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सरकार स्थापन करण्यास बोलावले होते. त्यांनी शपथ घेतली, पण बहुमत सिद्ध करता न आल्याने 13 दिवसांनी (28 मे 1996) त्यांना राजीनामा द्यावा लागला.
दुसरीकडे, विजय यांनी बुधवारी लोक भवनात राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तथापि, विजय यांनी केवळ 113 आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी केली. विजय यांनी आपला पाठिंबा सादर करण्यासाठी वेळ मागितला. 234 सदस्यीय विधानसभेत टीव्हीकेकडे 108 जागा आहेत. विजय यांनी दोन जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे एक जागा गमावल्यास एकूण संख्या 107 होईल. 233 जागांसहही बहुमत 118 राहील, त्यामुळे टीव्हीकेला आणखी 11 आमदारांची गरज आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रतिस्पर्धी डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पडद्यामागील चर्चा सुरू आहे. त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रस्तावावर चर्चा झाली आहे, ज्यानुसार एआयएडीएमके सरकार स्थापन करेल आणि डीएमके बाहेरून पाठिंबा देईल. या सूत्रामध्ये लहान पक्षांच्या पाठिंब्याचाही समावेश असू शकतो. तथापि, अद्याप कोणताही औपचारिक निर्णय घेण्यात आलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या