Prakash Ambedkar on Thalapathy Vijay: तामिनळनाडू राज्यात दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याचा करिष्मा दिसला. त्याचा पक्ष TVK ने 108 जागा जिंकल्या. विधानसभेत त्याचा वरचष्मा आहे. तर काँग्रेसनेही त्याला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्याने 113 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तयार केले असले तरी राज्यपालांनी त्याला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले नाही. त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी 118 ही मॅजिक फिगर आवश्यक आहे. त्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी त्या दोन राजकीय घटनांची आठवण करून दिली आहे.
त्या दोन राजकीय घटनांची आठवण
तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी अद्याप साऊथ सुपरस्टारला सत्ता स्थापनेसाठी कोणतेही निमंत्रण दिलेले नाही. तर आज सकाळी थलपती विजय हा राज्यपालांच्या भेटीला पोहचला. त्याने समर्थक आमदारांचे पत्र राज्यपालांना दिल्याचे समजते. तर राज्यपालांच्या भूमिकेवर टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या पेचप्रसंगावर दोन राजकीय घटनांची आठवण करून दिली आहे. त्यांच्या मते, टीव्हीकेकडे बहुमत नाही म्हणून तुम्ही त्या पक्षाला निमंत्रण देण्यास राज्यपाल नकार देऊ शकत नाही. राज्य घटनेच्या कलम 164(2) नुसार, विजय आणि त्याच्या मंत्रिमंडळाला विधानसभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. यापूर्वी अशी घटना घडली आहे.
Vijay’s TVK, which is the single largest party, should be invited by the Governor to become the Chief Minister and form the government in Tamil Nadu.
The Governor cannot not withhold the invitation to Vijay over his “doubts of TVK not having majority figures.” Under Article 164… https://t.co/oc4CKkNOAo
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar)
1989 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 194 जागा जिंकल्या. सर्वाधिक जागा जिंकूनही राजीव गांधी यांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिला. त्यांना राष्ट्रपतींनी सर्वात अगोदर सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. त्यानंतर व्ही. पी. सिंग यांना निमंत्रण देण्यात आले आणि 2 डिसेंबर 1989 रोजी ते पंतप्रधान झाले.
तर 1996 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हते. तरीही राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सत्ता स्थापनेसाठी पाचरण केले होते. त्यांनी शपथ घेतली. पण त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 13 दिवसांनी 28 मे 1996 रोजी त्यांनी राजीनामा दिला. याची आठवण आंबेडकर यांनी ट्विट करत करून दिली.